माया नगरीत म्हणजेच मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागून साधारण एक दशक पूर्ण होत आलंय. नाही म्हणायला आता मी त्या क्षेत्रातला जाणकार / माहितगार म्हणून (निदान माझ्या गावात तरी) ओळखला जाऊ लागलोय. हे मी छातीठोक पणे सांगू शकतो कारण बरेच जण ह्या मायानगरीच्या दिशेने खेचले जाताना सल्ला विचारायला म्हणून येतात. "आपली रिया डान्स उत्तम करते, कॉलेज मध्ये बक्षिस पण मिळवली आहेत, आता तिला रियालिटी शो मध्ये घालायचं ठरवलंय...ह्यावर तुमचा सल्ला हवाय. " "प्रद्युम्न वक्तृत्वात भारी झालाय बरं आता, चांगलस चैनल बघून त्याला anchor करावा म्हणतो, काय ? तुमचं काय मत आहे?" किंवा विविध भावामुद्रान्त्ले फोटो घेऊन "सुभाष घई म्हणे मराठी सिनेमे काढतोय ... त्यांचा नंबर 'भेटेल' का? " असे अनेक जण माझ्याकडे सल्ला विचारायला येतात. त्यापैकी ज्याचं सगळ आधीच ठरलेलं असतं त्यांना मी शुभेच्छा देऊन मोकळा होतो. मात्रं जे खरोखर माझं म्हणणं ऐकून घेणारे असतात त्यांच्याशी बोलताना माझी जाम गोची होते. कारण ते इतके उत्साहात मुंबईच्या दिशेने निघालेले असतात की त्यांना नाउमेद करावसं वाटत नाही. आणि इतके आंधळे पणाने जात असतात की दुर्लक्ष पण करवत नाही. फिल्म लाईन मध्ये जाण्यात किंवा त्याठिकाणी टिकून राहण्यात काय काय अडचणी येऊ शकतात हे समोर मांडल्यावर त्यापैकी बऱ्याच गोष्टी 'Adjust ' करायची त्यांची तयारी असते, मात्र एका प्रश्नावर सगळ्यांची ( विशेषत: मुलींच्या पालकांची) गाडी अडते....तो म्हणजे,
" फिल्म लायनितली माणसं चांगली नसतात असं ऐकलय... खरं असतं का हो ते?????"
खरतर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर मी अजूनतरी कोणाला देऊ शकलेलो नाही. पण गप्पांच्या ओघात मी त्यांना माझ्या अनुभवातले काही किस्से सांगतो आणि त्यावरून तुम्हीच अंदाज घ्या असं सुचवतो. त्यापैकीच एक लई भारी किस्सा आहे तो तुम्हला पण सांगतो....
सांताक्रूझच्या एका शुटिंग स्टुडीओ मध्ये मी 'Auditions ' (निवडचाचणी) घेत होतो. एका लो बजेट सिनेमा साठी कलाकार निवडण्याच काम माझ्यावर सोपवण्यात आलं होतं. म्हणजे त्यातल्या मुख्य कलाकारांची निवड स्वत: निर्माते साहेबांनी आधीच केली होती. हिरोइनची बहीण, हिरोचा मित्र अशा 'साइड कास्ट' ची निवड करून देण्याची जबाबदारी माझी होती. असं काम करणाऱ्याला इंडस्ट्री मध्ये 'कास्टिंग डायरेक्टर ' असं म्हणतात. फिल्मचा विषय आणि एकूणच आवाका फार काही ग्रेट नव्हता.. पण मला ह्या कामाचे बरे पैसे मिळणार होते त्यामुळे मी ते आनंदाने स्वीकारलं होतं. सकाळी ९ची वेळ होती.. प्रथे प्रमाणे निर्मात्याच्या खर्चाने नाश्ता करून आम्ही कामाला सुरुवात केली होती. साधारण ३० बाय ४० फुटाचा बंदिस्त स्टुडीओ... संपूर्ण वातानुकुलीत..मध्यभागी एक कलाकार उजळून दिसेल अशी प्रकाशयोजना केलेली.. बाकी अंधार.. एक साधा कॅमेरा लावलेला.. त्यामागे एक कॅमेरामन उभा.. चार कलाकार बसू शकतील असा एक कोच (सोफा)...सिनेमात काम मिळवण्यासाठी फुल तयारीत आलेले चार स्ट्रगलर त्यावर विराजलेले. बाहेर त्यांच्याच भावंडांची ही मोठी रांग लागलेली... कुठेतरी audition आहे ही बातमी खरंतर एक स्ट्र दुसऱ्या स्ट्र ला कधीच सांगत नाही पण तरीही बातमी वार्याच्या वेगाने पसरते . तसाच काहीस आमच्या Audition बद्दल झालं होतं आणि बरीच गर्दी जमली होती. सिनेमा 'क' दर्जाचा असलातरी स्ट्रगलर्सना काहीच फरक पडत नाही. त्यांना फक्त एक संधी हवी असते. आपल्यातल tallent दुनियेला दाखून देण्याची. अशाच एका संधीचं दार ठोठावण्यासाठी आज ते आमच्या कडे आले होते. आपण जास्तीतजास्त चांगले किंवा सेक्सी कसे दिसू अशा विचाराने पेहराव आणि मेकप केलेला... वेगवेगळ्या गेटप मधले स्वत:चे फोटो सोबत आणलेले... डायरेक्टरला impress करण्याचे अनेक प्लान्स डोक्यात शिजलेले... अशा ह्या बाहेर जमलेल्या ' स्ट्र' ना 'कलाकार' बनण्याची संधी मी देणार होतो..त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आज मी अतिशय महत्वाचा माणूस असणार होतो. माझ्या मदती करिता दोन सहाय्यक देण्यात आले होते. साधारण पंचविशीतले ..त्यातल्या एकाच मला नाव सुद्धा आठवत नाही इतका तो सामान्य होता.. आणि दुसरा मात्र इतका भारी होता कि त्याला मी आयुष्यात विसरू शकणार नाही. लव तिवारी हे त्याचं नाव..नावा प्रमाणेच त्याचे इंटरेस्ट ही तसेच होते. स्ट्रची पायरी नुकतीच ओलांडून सहाय्यक म्हणून छोटी मोठी कामं करुलागालेला .. दिसायला बराहोता, मिळणारे सगळे पैसे बहुतेक कपडे, accesories , परफ्युम्स ह्यांवारच खर्च करत असावा. आज तो मला assist करायला आला होता. त्याचा काम होतं आत आलेल्या स्ट्र ना स्क्रिप्ट देणे, audition साठी आवश्यक सूचना देणे आणि त्यांनी दिलेले फोटो किंवा profile मी संगेल त्या फाईल मध्ये ठेवणे.
मी तीन फाईल्स तयार केल्या होत्या. एक सिलेक्टेड कॅनडिडेट्सची ची, दुसरी second option ची आणि तिसरी rejected candidates ची... बाहेरचे चार स्ट्र आत येणार.. कास्टिंग कोच वर बसणार तिथे त्यांना स्क्रिप्ट दिलं जाणार.. एका कोपर्यात जाऊन त्यांनी ते पाठ करायचं... आणि मग आळीपाळीने कॅमेऱ्या समोर येऊन ते स्क्रिप्ट सादर करायचं. आणि बाहेर जाण्या पूर्वी माझ्या जवळ येऊन आपले फोटो दाखवायचे आणि profilechi कॉपी देऊन जायची. आमच्या सिनेमातल्या एखाद्या पात्रा साठी ती व्यक्ती जर मला योग्य वाटली, विचार करावा अशी वाटली किंवा अयोग्य वाटली तर त्या नियोजित फाईल मध्ये तिचं profile / फोटो मी लावायला सांगणार.. आणि आमच्या मुख्य दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या संमतीने नंतर त्यांना निर्णय कळवण्यात येणार.. अशी साधारण audition घेण्याची माझी पद्धत होती. त्याप्रमाणे स्पॉटदादांनी नारळ फोडला आणि पहिला स्ट्र कॅमेर्या समोर आपली अभिनय कला सादर करू लागला.
खूप तावातावात संवाद फेकत होता, कुठल्याही मूड मधला डायलॉग इतका ओरडून म्हणत होता कि बहुदा मायक्रोफोन चा शोध लागलाय हे त्याला माहीतच नसावं.
दुसरा एक हिरो आला चेहेरामोहरा बरा होता पण तोंड उघडल्यावर सगळा आनंदच होता. त्याची हिंदी सुधारावण्यात माझा जन्म गेला असता.
एक कन्या आली सगळे डायलॉग एकादमात म्हणून गेली , पण दिसायला कशी होती ते मलाही दिसलं नाही आणि कॅमेर्यालाही. कारण ती पूर्ण वेळ प्रकाशझोताच्या बाहेर उभी होती. साधा लाईट सुद्धा घेता येत नाही म्हटल्यावर तिने माझ्या कितीही 'जवळ' येऊन सांगायचा प्रयत्न केला तरी मी तीचा अर्ज reject च्याच फाईल मध्ये टाकायला सांगितला.
आणखी एक मुलगा आला, दिलेला संवाद उत्तम सादर केला, मला अपेक्षित असलेल्या एका व्याक्तीरेखेकारिता त्याचा विचार करावा असं मला वाटलं म्हणून मी त्याला थोडी डान्सची झलक दाखव म्हटलं. कारण त्या व्यक्तिरेखेची तशी गरज होती. त्याच्या चोईसच्या गाण्यावर त्याने नृत्य सुरु केलं, एक दोन स्टेप्स केल्या आणि त्याच्या लक्षात आलं की pant ची झिप उघडी आहे म्हणून, खरतर त्याच्या आधी आमच्या ही ते लक्षात आलं होतं पण आम्ही दुर्लक्ष केलं होतं. मात्र सोफ्यावर बसलेल्या त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बाब त्याच्या निदर्शनास आणून देण्याची सुवर्णसंधी अजिबात सोडली नव्हती. झाल्या प्रकाराने तो इतका बावरला की दुसरा चान्स देण्याचा माझा विचार ऐकण्याआधीच थेट studio बाहेर निघून गेला.
एक सुंदरी कॅमेर्यासमोर अडखळली आणि ओक्साबोक्सी रडायलाच लागली. मी काही बोलणार तेवढ्यात आमचा 'लव बर्ड ' पुढे सरसावला. " सरजी! मैं संभाल लेता हु , आप कंटिन्यू किजीये ना ." असं म्हणत त्या रडकन्येला खोपच्यात घेऊन गेला. मी कंटिन्यू केलं.. जरा वेळाने तिला स्मीत हास्य करत, लाजत बाहेर जातांना फक्त पाहिल्याच मला आठवतंय.
Audition देऊन झालेल्या एका मुलीच्या आवाजाने व्यत्यय येऊन आम्ही थांबलो. काय तर म्हणे तिचा मोबाईल हरवला होता. "अभी अभी तो यही रखा था, पतानही कहा खो गया?" असं म्हणत ती सर्वांना शोधण्याची विनंती करत होती. अर्थातच तिवारी धावून गेला. खोलीतल्या खोलीत मोबाईल हरवल्यावर कोणीही आधी काय करेल? तेच त्यानेही केला.. "मिस ! आपका नंबर बताइये, मैं रिंग देता हु." मिस ने पण मोठ्या आवाजात तिचा नंबर सांगितला. उपस्थित ३-४ इच्छुक्कांनी पटापट तो नंबर डायल केला. एकाचा कुणाचा तरी लागला आणि सोफ्याच्या फटीत मिस चा मोबईल अखेर सापडला.
मी " next please " असा मोठ्याने आवाज देताच जी मुलगी कोच वरून उठली तिच्या कॅट वॉक ने माझं पण लक्ष वेधून घेतलं. तिला बघून नकळत तोंडातून 'WOW ' निघावं.... पण अनुभवी असल्याने मी ते मनातच ठेवलं आणि लव तिवारींच्या जिभेने मात्र धोका दिला. त्याच्या कडून मिळालेली दाद तिने नजरेनेच appreciate केली. ती सेक्सी कन्या कॅमेर्यासमोर उभी राहिली. हलकासा मेकप, ओठ तेवढे गडद..... extra mini स्कर्ट आणि अगदी 'नियत खराब ' गळ्याचा top ... तिने आमच्या कडे असं काही पाहिलं की मी पण क्षणभर Action म्हणायला विसरलो. जी आकर्षकता रूपात तीच अभिनयात आणि नृत्यातही होती. स्वत: ला सावरून मी पुन: पुन: विचार करून पहिला. पण खरच तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. मी "O .K . Thank you !" म्हणताच ती माझ्या 'जवळ' आली. फोटो दाखवताना अशी काही वाकून उभी राहिली की माझी नजर पण खाली फोटो कडे झुकली. तर फोटो तिच्या पेक्षा हॉट होते. पण तोवर माझा निर्णय झाला होता. तिच्या profile ला select फाईलचा रस्ता दाखवायला सांगून मी पुढच्या उमेदवाराकडे वळलो. तिला मात्र मला अजून बरंच काही सांगायचं होतं. खरं तर एका भुमिके साठी तिची निवड झाली होती पण हे तिला माहित नसल्याने ती बहुदा डायरेक्टर ला इम्प्रेस कार्याच्या प्रयत्नात होती. पण तोवर माझ्यातल्या प्रोफेशनल ने माझ्यावर मात केली होती. मी दुर्लक्ष करतोय म्हटल्यावर ती मधेच सुरु झाली," ओह शीट! मेरा सेल फोन??" पुन: काम थांबलं .. ती फोन शोधू लागली.. तिवारीचं स्त्रीदाक्षिन्य पुन: उफाळून आलं. पुन: तिने संपूर्ण studiola ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात स्वत:चा सेल नंबर सांगितला. त्या अंधारात मोबाईल्सचे अनेक kye pads चमकले. ह्यावेळी तिवारींचा मटका लागला.. आणि माडम चा फोन सापडला.
आत्ता कुठे माझ्या लक्षात आल की दोघींचे मोबाईल हरवण हा काही योगायोग नव्हता, तर आपला नंबर circulate करण्याचा हा एक नवीन मार्ग होता. पण अशी गरज का पडावी? त्याचा फायदा काय? तर ... Audition दिल्या नंतर पुढे काय झाल हे जाणून घेण्या साठी, किंवा वशिला लावण्या साठी युनिट मधल्या कोणाशी तरी संपर्कात राहायला हवं. आणि अशावेळी फोन नंबर्स एकमेकांजवळ असलेतर फायद्याच ठरतं. पोरींची ट्रीक माझ्या लक्षात आली मात्र अशा गोष्टींच आकर्षण वाटण्याच्या किंवा बळी पडण्याच्या वयाच्या मी केंव्हाच पलीकडे गेलेला असल्याने मी गम्मत वाटून विषय तिथेच सोडून दिला. Next .. Next करत आमच्या Auditions चालूच राहिल्या.... रात्री Packup झालं, मला माझा 'पाकीट' मिळालं आणि हा विषय माझ्या साठी तिथेच संपला.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी सामान्य वाटणारा तिवारीच्या बरोबरचा तो दुसरा सहाय्यक मला भेटला.. त्याने ओळख सांगितल्यावर मी त्याला सहज विचारलं की तिवारी काय म्हणतोय? तर त्यावर त्याने सांगितलेल्या गोष्टीने माझ्या तर फुल दांड्या उडाल्या.. तो म्हणाला आपल्या Audition नंतर लव तिवारीने त्या Sexy मुलीला फोन केला होता म्हणे.. तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारल्या. तिलाही ते अपेक्षितच होतं म्हणा.. त्यावर सामान्य assitant म्हणाला," सर! वो लाडकी तो आपसे फोन कि उम्मीद कर राही थी, केकीन आपने तो उसे भाव ही नाही दिया. " मला गुदगुल्या झाल्या पण मनातल्या मनात. मी म्हटलं फीर? " फीर क्या ! तिवारी चान्स मार गया. "
त्या तीवारयाने तिला सांगितला कि मी तुला त्या फिल्म मध्ये रोल मिळून देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला भेटावं लागेल वगैरे.. तिला हेही अपेक्षीत असावं. नंतर एका संध्याकाळी ती दोघं भेटली, आधी कॉफी, मग डिनर विथ बिअर आणि रात्री तो तिला तिच्या रूम वर सोडायला गेला, इतकीच स्टोरी सामान्यांना माहित होती. पुढच्या भेटीत त्याने तिला सांगितल की Audition घेणारा दाढीवाला डायरेक्टर जाम खडूस आहे त्याला मी पटवतोय पण काही पैसे लागतील. पैसे खरच दिले की नाही ते ह्या सामन्याला माहित नव्हतं. अनेक auditions चा अनुभव पाठीशी असला तरी producer च्या फेऱ्या मारून तीही थकली असावी , कदाचित घरच्यांच्या मर्जी विरुद्ध मुंबईत आली असावी.. स्वत:ला मेंटेन करण्यासाठी किती पैसे लागत असतील? आर्थिक परिस्थितीने गांजली असेल... आणि म्हणून तो रोल तिला हवाच असेल... आणि तिवारीच्या माध्यमातून का होईना तिला तो हवाच होता. म्हणून ती त्याच्या बरोबर फिरली आणि वगैरे..वगैरे.. . मायानागारीच्या फेस लेस दुनियेत तिला ते जमलं पण असेल.. अखेर कधीतरी मन भरल्या नंतर तिवारीने तिला गुड न्यूज देऊन टाकली की डायरेक्टर पटलाय आणि तिला तो रोल मिळाला आहे.
म्हणजे ज्या मुलीला मी audition च्या वेळीच तिच्या गुणांच्या जोरावर निवडलं होतं त्या मुलीला ह्याने फिरव फिरव फिरवलं आणि नंतर फक्त selection चा निरोप दिला.
हा किस्सा ऐकल्या नंतर बर्याच जणांच्या डोळ्या समोरचं चित्र स्पष्ट होतं. आणि मी माझ्या जबादारीतून सुटतो.
तर मित्रांनो , ही आहे मुंबई नगरिया.. म्हणजे ती वाईटच आहे, त्या दिशेने जाऊच नये असं अजिबात नाही. त्या क्षेत्रातले ६०% लोक वाईट आहेत, तर २०% संधी न मिळालेले चारित्र्यवान आहेत.. आणि केवळ २० % लोक खरोखर चांगले आहेत. आपल्याला त्या माया नगरीच्या दिशेने जायचा असेल तर जरूर जा पण सोच -विचार करूनच. आणि तिथे गेल्यावर शेवटच्या २० टक्क्यांपैकी होऊन राहायचं असेल तर आपल्यातला 'प्रोफेशनल' सतत जागृत कसा राहील ह्याचाच विचार झाला पाहिजे. 'विचार पूर्वक घेतलेला निर्णय ' हा देखील फिल्म इंडस्ट्रीत जाण्याच्या तयारीचा एक भाग असला पाहिजे. म्हणूनच म्हटलं, "इ हैं मुंबई नगरिया तू सोच बबुवा...".
अगर आपने सोच लिया हो तो फिर,
" You are most well come to the film industry."
No comments:
Post a Comment