Tuesday 24 May 2011

इ हैं मुंबई नगरिया तू सोच बबुवा...




माया नगरीत म्हणजेच मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागून साधारण एक दशक पूर्ण होत आलंय. नाही म्हणायला आता मी त्या क्षेत्रातला जाणकार / माहितगार म्हणून (निदान माझ्या गावात तरी) ओळखला जाऊ लागलोय. हे मी छातीठोक पणे सांगू शकतो कारण बरेच जण ह्या मायानगरीच्या दिशेने खेचले जाताना सल्ला विचारायला म्हणून येतात. "आपली रिया डान्स उत्तम करते, कॉलेज मध्ये बक्षिस  पण मिळवली आहेत, आता तिला रियालिटी शो मध्ये घालायचं ठरवलंय...ह्यावर तुमचा सल्ला हवाय. " "प्रद्युम्न वक्तृत्वात भारी झालाय बरं आता, चांगलस चैनल बघून त्याला anchor करावा म्हणतो, काय ? तुमचं काय मत आहे?" किंवा विविध भावामुद्रान्त्ले फोटो घेऊन "सुभाष घई म्हणे मराठी सिनेमे काढतोय ... त्यांचा नंबर 'भेटेल' का? " असे अनेक जण माझ्याकडे सल्ला विचारायला येतात. त्यापैकी ज्याचं सगळ आधीच ठरलेलं असतं त्यांना मी शुभेच्छा देऊन मोकळा होतो. मात्रं जे खरोखर माझं म्हणणं ऐकून घेणारे असतात त्यांच्याशी बोलताना माझी जाम गोची होते. कारण ते इतके उत्साहात मुंबईच्या दिशेने निघालेले असतात की त्यांना नाउमेद करावसं वाटत नाही. आणि इतके आंधळे  पणाने जात असतात की दुर्लक्ष पण करवत नाही. फिल्म लाईन मध्ये जाण्यात किंवा त्याठिकाणी टिकून राहण्यात काय काय अडचणी येऊ शकतात हे समोर मांडल्यावर त्यापैकी बऱ्याच गोष्टी 'Adjust ' करायची त्यांची  तयारी असते, मात्र एका प्रश्नावर सगळ्यांची ( विशेषत: मुलींच्या पालकांची) गाडी अडते....तो म्हणजे,
" फिल्म लायनितली माणसं चांगली  नसतात असं ऐकलय... खरं असतं का हो ते?????"
खरतर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर मी अजूनतरी कोणाला देऊ शकलेलो नाही. पण गप्पांच्या ओघात मी त्यांना माझ्या अनुभवातले काही किस्से सांगतो आणि त्यावरून तुम्हीच अंदाज घ्या असं सुचवतो. त्यापैकीच एक लई भारी किस्सा आहे तो तुम्हला  पण सांगतो.... 
सांताक्रूझच्या एका शुटिंग स्टुडीओ मध्ये मी 'Auditions ' (निवडचाचणी) घेत होतो. एका लो बजेट सिनेमा साठी कलाकार निवडण्याच काम माझ्यावर सोपवण्यात आलं होतं. म्हणजे त्यातल्या मुख्य कलाकारांची निवड स्वत: निर्माते साहेबांनी आधीच केली होती. हिरोइनची बहीण, हिरोचा मित्र अशा 'साइड कास्ट' ची निवड करून देण्याची जबाबदारी माझी होती. असं काम करणाऱ्याला इंडस्ट्री मध्ये  'कास्टिंग डायरेक्टर ' असं म्हणतात. फिल्मचा विषय आणि एकूणच आवाका फार काही ग्रेट नव्हता.. पण मला ह्या कामाचे बरे पैसे मिळणार होते त्यामुळे मी ते आनंदाने स्वीकारलं होतं. सकाळी ९ची वेळ होती.. प्रथे प्रमाणे निर्मात्याच्या खर्चाने नाश्ता करून आम्ही कामाला सुरुवात केली होती. साधारण ३० बाय ४० फुटाचा बंदिस्त स्टुडीओ... संपूर्ण वातानुकुलीत..मध्यभागी एक कलाकार उजळून दिसेल अशी प्रकाशयोजना केलेली.. बाकी अंधार.. एक साधा कॅमेरा लावलेला.. त्यामागे एक कॅमेरामन उभा.. चार कलाकार बसू शकतील असा एक कोच (सोफा)...सिनेमात काम मिळवण्यासाठी फुल तयारीत आलेले चार स्ट्रगलर त्यावर विराजलेले. बाहेर त्यांच्याच भावंडांची ही मोठी रांग लागलेली... कुठेतरी  audition आहे ही बातमी खरंतर एक स्ट्र दुसऱ्या स्ट्र ला कधीच सांगत नाही पण तरीही बातमी वार्याच्या वेगाने पसरते . तसाच काहीस आमच्या Audition  बद्दल झालं होतं आणि बरीच गर्दी जमली होती. सिनेमा 'क' दर्जाचा असलातरी  स्ट्रगलर्सना    काहीच फरक पडत नाही. त्यांना फक्त एक संधी हवी असते. आपल्यातल tallent दुनियेला दाखून देण्याची. अशाच एका संधीचं दार ठोठावण्यासाठी आज ते आमच्या कडे आले होते.  आपण जास्तीतजास्त चांगले किंवा  सेक्सी  कसे दिसू अशा विचाराने पेहराव आणि मेकप केलेला... वेगवेगळ्या गेटप मधले स्वत:चे फोटो सोबत आणलेले... डायरेक्टरला impress  करण्याचे अनेक प्लान्स डोक्यात शिजलेले... अशा ह्या बाहेर जमलेल्या  ' स्ट्र' ना 'कलाकार' बनण्याची संधी मी देणार होतो..त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आज मी अतिशय महत्वाचा माणूस असणार होतो. माझ्या मदती करिता दोन सहाय्यक देण्यात आले होते. साधारण पंचविशीतले ..त्यातल्या  एकाच मला नाव सुद्धा आठवत नाही इतका तो सामान्य होता.. आणि दुसरा मात्र इतका भारी होता कि त्याला मी आयुष्यात विसरू शकणार नाही. लव तिवारी हे त्याचं नाव..नावा  प्रमाणेच त्याचे इंटरेस्ट ही तसेच होते. स्ट्रची पायरी नुकतीच ओलांडून सहाय्यक म्हणून छोटी मोठी कामं करुलागालेला .. दिसायला बराहोता, मिळणारे सगळे पैसे बहुतेक कपडे, accesories , परफ्युम्स ह्यांवारच खर्च करत असावा. आज तो मला assist करायला आला होता. त्याचा काम होतं आत आलेल्या स्ट्र ना स्क्रिप्ट देणे, audition साठी आवश्यक सूचना देणे आणि त्यांनी दिलेले फोटो किंवा profile मी संगेल त्या फाईल मध्ये ठेवणे.
मी तीन  फाईल्स तयार केल्या होत्या. एक सिलेक्टेड कॅनडिडेट्सची ची, दुसरी second option ची आणि तिसरी rejected candidates ची... बाहेरचे चार स्ट्र आत येणार.. कास्टिंग कोच वर बसणार तिथे त्यांना स्क्रिप्ट दिलं जाणार.. एका कोपर्यात जाऊन त्यांनी ते पाठ करायचं... आणि मग आळीपाळीने कॅमेऱ्या  समोर येऊन ते स्क्रिप्ट सादर करायचं. आणि बाहेर जाण्या पूर्वी माझ्या जवळ येऊन आपले फोटो दाखवायचे आणि profilechi कॉपी देऊन जायची. आमच्या सिनेमातल्या एखाद्या पात्रा  साठी ती व्यक्ती जर मला   योग्य वाटली, विचार करावा अशी वाटली किंवा अयोग्य वाटली तर त्या नियोजित फाईल मध्ये  तिचं profile / फोटो मी लावायला सांगणार.. आणि आमच्या मुख्य दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या संमतीने नंतर त्यांना निर्णय कळवण्यात येणार.. अशी साधारण audition घेण्याची माझी पद्धत होती. त्याप्रमाणे स्पॉटदादांनी  नारळ फोडला आणि पहिला स्ट्र कॅमेर्या समोर आपली अभिनय कला सादर करू लागला. 
खूप  तावातावात संवाद फेकत होता, कुठल्याही मूड मधला डायलॉग इतका ओरडून म्हणत होता कि बहुदा मायक्रोफोन चा शोध लागलाय हे त्याला माहीतच नसावं. 
दुसरा एक हिरो आला चेहेरामोहरा बरा होता पण तोंड उघडल्यावर सगळा आनंदच होता. त्याची हिंदी सुधारावण्यात माझा जन्म गेला असता. 
एक कन्या आली सगळे डायलॉग एकादमात म्हणून गेली , पण दिसायला कशी होती ते मलाही दिसलं नाही आणि कॅमेर्यालाही. कारण ती पूर्ण वेळ प्रकाशझोताच्या बाहेर उभी होती. साधा लाईट सुद्धा घेता येत नाही म्हटल्यावर तिने माझ्या कितीही 'जवळ' येऊन सांगायचा प्रयत्न केला तरी मी तीचा अर्ज reject च्याच  फाईल मध्ये टाकायला सांगितला.
आणखी एक मुलगा आला, दिलेला संवाद उत्तम सादर केला, मला अपेक्षित असलेल्या एका व्याक्तीरेखेकारिता त्याचा विचार करावा असं मला वाटलं  म्हणून मी त्याला थोडी डान्सची झलक दाखव म्हटलं. कारण त्या व्यक्तिरेखेची तशी गरज होती. त्याच्या चोईसच्या गाण्यावर त्याने नृत्य सुरु केलं, एक  दोन स्टेप्स केल्या आणि त्याच्या लक्षात आलं की pant ची झिप उघडी आहे म्हणून, खरतर त्याच्या आधी आमच्या ही ते लक्षात आलं  होतं पण आम्ही दुर्लक्ष केलं होतं. मात्र सोफ्यावर बसलेल्या त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बाब त्याच्या निदर्शनास आणून देण्याची  सुवर्णसंधी अजिबात सोडली नव्हती. झाल्या प्रकाराने तो इतका बावरला की दुसरा चान्स देण्याचा माझा विचार ऐकण्याआधीच थेट studio बाहेर निघून गेला. 
एक सुंदरी कॅमेर्यासमोर अडखळली आणि ओक्साबोक्सी रडायलाच  लागली.  मी काही बोलणार तेवढ्यात आमचा 'लव बर्ड ' पुढे सरसावला. " सरजी! मैं संभाल लेता हु , आप कंटिन्यू किजीये ना ." असं म्हणत त्या रडकन्येला  खोपच्यात घेऊन गेला. मी कंटिन्यू केलं.. जरा वेळाने तिला स्मीत हास्य करत, लाजत बाहेर जातांना फक्त पाहिल्याच मला आठवतंय. 
Audition देऊन झालेल्या एका मुलीच्या आवाजाने व्यत्यय येऊन आम्ही थांबलो. काय तर म्हणे तिचा मोबाईल हरवला होता. "अभी अभी तो यही रखा था, पतानही कहा खो गया?"   असं म्हणत ती सर्वांना शोधण्याची विनंती करत होती. अर्थातच तिवारी धावून  गेला. खोलीतल्या खोलीत मोबाईल हरवल्यावर कोणीही आधी काय करेल? तेच त्यानेही केला.. "मिस ! आपका नंबर बताइये, मैं रिंग देता हु." मिस ने पण मोठ्या आवाजात तिचा नंबर सांगितला. उपस्थित ३-४ इच्छुक्कांनी पटापट तो नंबर डायल केला. एकाचा कुणाचा तरी लागला आणि सोफ्याच्या फटीत मिस चा मोबईल अखेर सापडला. 
मी " next please " असा मोठ्याने आवाज देताच जी मुलगी कोच वरून उठली तिच्या कॅट वॉक ने माझं पण लक्ष वेधून घेतलं. तिला बघून नकळत तोंडातून 'WOW ' निघावं.... पण अनुभवी असल्याने मी ते मनातच ठेवलं आणि लव तिवारींच्या जिभेने मात्र  धोका दिला. त्याच्या कडून मिळालेली दाद तिने नजरेनेच appreciate केली. ती सेक्सी कन्या कॅमेर्यासमोर उभी राहिली. हलकासा मेकप, ओठ तेवढे गडद..... extra  mini स्कर्ट आणि अगदी 'नियत खराब ' गळ्याचा top ... तिने आमच्या कडे असं काही पाहिलं की मी पण क्षणभर Action म्हणायला विसरलो. जी आकर्षकता रूपात तीच अभिनयात आणि नृत्यातही  होती.  स्वत: ला सावरून मी पुन: पुन: विचार करून पहिला. पण खरच तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. मी "O .K . Thank you !" म्हणताच ती माझ्या 'जवळ' आली. फोटो दाखवताना अशी काही वाकून उभी राहिली की माझी नजर पण खाली फोटो कडे झुकली. तर फोटो तिच्या पेक्षा हॉट होते. पण तोवर माझा निर्णय झाला होता. तिच्या profile ला select फाईलचा रस्ता दाखवायला सांगून मी पुढच्या उमेदवाराकडे वळलो. तिला मात्र मला अजून बरंच काही सांगायचं होतं. खरं तर एका भुमिके साठी तिची निवड झाली होती पण हे तिला माहित नसल्याने ती बहुदा डायरेक्टर ला इम्प्रेस कार्याच्या प्रयत्नात होती. पण तोवर माझ्यातल्या प्रोफेशनल ने माझ्यावर मात केली होती. मी दुर्लक्ष करतोय म्हटल्यावर ती मधेच सुरु झाली," ओह शीट! मेरा सेल फोन??"  पुन: काम थांबलं .. ती फोन शोधू लागली.. तिवारीचं स्त्रीदाक्षिन्य पुन: उफाळून आलं. पुन: तिने संपूर्ण studiola ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात स्वत:चा सेल नंबर सांगितला. त्या अंधारात मोबाईल्सचे अनेक kye pads चमकले. ह्यावेळी तिवारींचा मटका लागला.. आणि  माडम चा फोन सापडला.  
आत्ता कुठे माझ्या लक्षात आल की दोघींचे मोबाईल हरवण हा काही योगायोग नव्हता, तर आपला नंबर circulate करण्याचा  हा एक  नवीन मार्ग होता. पण अशी गरज का पडावी? त्याचा फायदा काय? तर ... Audition दिल्या नंतर पुढे काय झाल हे जाणून घेण्या साठी, किंवा वशिला लावण्या साठी युनिट मधल्या कोणाशी तरी संपर्कात राहायला हवं. आणि अशावेळी फोन नंबर्स एकमेकांजवळ असलेतर फायद्याच ठरतं. पोरींची  ट्रीक  माझ्या लक्षात आली मात्र अशा गोष्टींच आकर्षण वाटण्याच्या किंवा बळी पडण्याच्या वयाच्या मी केंव्हाच  पलीकडे गेलेला असल्याने मी गम्मत वाटून विषय तिथेच सोडून दिला. Next ..  Next करत आमच्या Auditions चालूच राहिल्या.... रात्री Packup झालं, मला माझा 'पाकीट' मिळालं आणि हा विषय माझ्या साठी तिथेच संपला.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी  सामान्य वाटणारा तिवारीच्या बरोबरचा  तो दुसरा सहाय्यक मला भेटला.. त्याने ओळख सांगितल्यावर मी त्याला सहज विचारलं की तिवारी काय म्हणतोय? तर त्यावर त्याने सांगितलेल्या गोष्टीने माझ्या तर फुल दांड्या उडाल्या.. तो म्हणाला आपल्या Audition नंतर लव तिवारीने त्या Sexy मुलीला फोन केला होता म्हणे.. तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारल्या. तिलाही ते अपेक्षितच होतं म्हणा.. त्यावर सामान्य assitant म्हणाला," सर! वो लाडकी तो आपसे फोन कि उम्मीद कर राही थी, केकीन आपने तो उसे भाव ही नाही दिया. " मला गुदगुल्या झाल्या पण मनातल्या मनात. मी म्हटलं फीर? " फीर क्या ! तिवारी चान्स मार गया. "
त्या तीवारयाने तिला सांगितला कि मी तुला त्या फिल्म मध्ये रोल मिळून देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला भेटावं लागेल वगैरे..  तिला हेही अपेक्षीत असावं. नंतर एका संध्याकाळी ती दोघं भेटली, आधी कॉफी, मग डिनर विथ बिअर आणि रात्री तो तिला तिच्या रूम वर सोडायला गेला, इतकीच स्टोरी सामान्यांना माहित होती.  पुढच्या भेटीत त्याने तिला सांगितल की Audition घेणारा दाढीवाला डायरेक्टर जाम खडूस आहे त्याला मी पटवतोय पण काही पैसे लागतील. पैसे खरच दिले की नाही ते ह्या सामन्याला माहित नव्हतं. अनेक auditions चा अनुभव पाठीशी असला तरी producer च्या फेऱ्या मारून तीही थकली असावी , कदाचित घरच्यांच्या मर्जी विरुद्ध मुंबईत आली असावी.. स्वत:ला मेंटेन करण्यासाठी किती पैसे लागत असतील? आर्थिक परिस्थितीने गांजली असेल... आणि म्हणून तो रोल तिला हवाच असेल... आणि तिवारीच्या माध्यमातून का होईना तिला तो हवाच होता. म्हणून ती त्याच्या बरोबर फिरली आणि वगैरे..वगैरे.. . मायानागारीच्या फेस लेस दुनियेत तिला ते जमलं  पण असेल.. अखेर कधीतरी मन भरल्या नंतर तिवारीने तिला गुड न्यूज देऊन टाकली की डायरेक्टर पटलाय आणि तिला तो रोल मिळाला आहे.
म्हणजे ज्या मुलीला मी audition च्या वेळीच तिच्या गुणांच्या जोरावर निवडलं होतं त्या मुलीला ह्याने फिरव फिरव फिरवलं  आणि नंतर फक्त selection चा निरोप दिला. 
हा किस्सा ऐकल्या नंतर बर्याच जणांच्या डोळ्या समोरचं चित्र स्पष्ट होतं. आणि मी माझ्या जबादारीतून सुटतो. 

तर मित्रांनो , ही आहे मुंबई नगरिया.. म्हणजे ती वाईटच  आहे, त्या दिशेने जाऊच नये असं अजिबात नाही. त्या क्षेत्रातले ६०% लोक वाईट आहेत, तर २०% संधी न मिळालेले चारित्र्यवान  आहेत.. आणि केवळ २० % लोक खरोखर चांगले आहेत. आपल्याला त्या माया नगरीच्या दिशेने जायचा असेल तर जरूर जा पण सोच -विचार करूनच. आणि तिथे गेल्यावर शेवटच्या २० टक्क्यांपैकी होऊन राहायचं असेल तर आपल्यातला 'प्रोफेशनल' सतत जागृत कसा राहील ह्याचाच विचार  झाला  पाहिजे. 'विचार पूर्वक घेतलेला निर्णय ' हा देखील फिल्म इंडस्ट्रीत जाण्याच्या तयारीचा एक भाग असला पाहिजे.   म्हणूनच म्हटलं, "इ हैं मुंबई नगरिया तू सोच बबुवा...". 

अगर आपने सोच लिया हो तो फिर,
" You are most well come to the film industry."


      



-- 

Tuesday 17 May 2011

माझी नवीन कॅरा व्हैन..( CARAVAN )

मित्रांनो तुम्हा सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी एक कॅरा व्हैन..( CARAVAN ) घेतली आहे. अर्थात सेकंड hand  आहे , पण आपली गरज भागवेल अशी आहे. एक ब्रिटीश जोडपं भारत फिरायला आलं होतं, ह्या कॅरा व्हैन..( CARAVAN ) मधून त्यांनी भारत पहिला, अनुभवला.पण मायदेशी परत जातांना त्यांनी हे धूड परत नेण्या पेक्षा  मिळेलत्या किमतीला विकून टाकायचं ठरवलं. सुदैवाने माझी त्यांची भेट झाली आणि त्याच वेळी एक F .D . matuer होत होती..मग थोडी हिम्मत केली आणि घेऊन टाकली.
आपल्या स्वत:च्या कॅरा व्हैन  सध्या मी कोकणच्या सफरीवर निघालोय. आज गणपतीपुल्या पासून सहा कि.मी. वरच्या 'नेवरे' गावानजीकच्या समुद्र किनाऱ्यावर मुक्कामी आहे. रात्रीचे साधारण ९:३० - १०:०० वाजले असावेत, हो माझ्या ह्या कॅरा व्हैन मध्ये घड्याळ मुद्दामच नाही ठेवलाय. किनाऱ्यावरची वर्दळ केंव्हाच  कमी झाली आहे. नुकतीच एक मच्छिमार बोट डूग डूग करत  कोलीवाड्याकडे गेलीय .. आता  फक्त समुद्राची गाज aikoo येते आहे. वाळूवर पडलेल्या चांदण्याच्या  मोहानं बाहेर पाहिलं तर दूरवर पसरलेल्या त्या किनाऱ्यावर फक्त मी आणी माझी  कॅरा व्हैन, दोघेच आहोत...चांदणं कितीही सुंदर असलं तरी ते आपल्या सुरक्षीत खिडकीतूनच अनुभवावं ह्या मध्यम वर्गीय विचाराने मी छोटस टेबल आणि खुर्ची आत घेती आणि कॅरा व्हैनची एक खिडकी उघडून मस्त पहुडलोय... गोरा साहेब बराच रसिक असावा.. त्याने ह्या व्हैन च्या छताला 'सन  रूफ'  ची जागा करून ठेवलीये. त्यामुळे बंद व्हैन मध्ये पण  खुल्या आकाश खाली झोपण्याचा आनंद मी ह्या क्षणाला अनुभवतोय. पण हे सुख एकट्याने अनुभवण्यात काय मजा? म्हणून ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींशी ते शेअर करावा म्हटलं.. आणि लगेच खिडकीला चिकटून फोल्ड करून ठेवलेला लिखाणाचा टेबल उभाकेला , laptop काढला connect  केला  आणि आणि माझा हा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. 

साधारण एका टेम्पो ट्राव्हलर पेक्षा जराशी कमी आकाराची माझी ही कॅरा व्हैन आहे. भटक्या माणसाची गरज लक्षात घेऊन doka लावून  डिझाईन केलीये. ती ट्रक्टर च्या ट्रोली सारखी गाडीच्या मागे ओढून नेता येते. गरजे पुरतं रेशन भरायचं एक जीन्स, २-३ टी- शर्टस घ्यायचे आणि प्रवासाला निघायचं ..  आणि जिथे दिवस मावळेल तिथे गाडी उभी करून मुक्काम ठोकायचा. हॉटेलच्या रूम चा खर्च नको की लॉज सुरक्षित आहे की नाहीच टेन्शन पण नको.  कॅरा व्हैनमध्ये चार जणांना बसण्याची आणि झोपण्याची सोय आहे. एक colapsable लिखाणाचं टेबल आहे. आडव्या खिडकीला  लागून छोटासा किचनचा ओटा आहे, ज्यावर एका शेगडीचा गस, कप विसळायला छोटासा बेसिन आणि चहा- साखरेचे डबे ठेवायला कपाट आहे.  गेले दोन दिवस मी फक्त maggy आणि चहाच  करतोय पण ठरवलं तर पूर्ण स्वयंपाकही करता  येवू शकतो.  त्याचप्रमाणे कसबस बस्तायेईल एवढा एक toilet सीट पण आहे.. अंघोळ मात्र बाहेर उघड्यावरच करावी लागते तेवढा एक लोचा आहे. टपावारच्या टाकीतून एक आउटलेट बाहेरच्या बाजूला काढलेलं  आहे त्याला shower लावायचा आणि अंघोळ करायची अशी रचना साहेबाने करून ठेवली आहे. ब्रिटनच्या किनाऱ्यावर ठीक आहे हो पण आपल्याकडे गाडीच्या बाहेर उघड्यावरची अंघोळ म्हणजे तमाशाच की... सकाळी  मी अंघोळीचा विचार आमलात आणायचा प्रयत्न केला तर पोर तोरांची  ही गर्दी जमा झाली, मग हातपाय धुवूनच समाधान मानावं लागलं . केवळ ह्याच कारणाने बायको सोबत आलेली नाही. :-)  toilet ची सोय आहे खरी पण वाटेत कुठेतरी आड बाजूला थांबून पोर्टेबल सेप्टिक टंक स्वच्छ करण्याचं घाणेरड काम करावं लागतं.  बाहेरच्या बाजूला म्हणाल तर तीन काठ्या लाऊन तंबू ठोकायची मस्त सोय आहे. त्याखाली मांडून बसायला छोटं टेबल आणि घडीच्या दोन खुर्च्या पण आहेत. mobile laptop चं चार्जिंग battery वर होता तर back up  साठी पोर्टेबल जनरेटर पण आहे.   वाट फुटेल तिथे भटकायला जाणाऱ्याला अजून काय पाहिजे? तर अशी ही  कॅरा व्हैन घेऊन मी आडवाटेने कोकण फिरायला निघालोय. होtaहोइल तेवढ आतल्या रस्त्याने फिरायचं, हायवेला लागायचच  नाही. घड्याळाच्या  गुलामी पेक्षा नारायणाच्या मार्गदर्शनावर चालायचं ...नवीन प्रदेश बघायचा, नवीन माणसांना भेटायचं आणि बिना reservation चा एक अनुभव समृद्ध प्रवास करायचा.... 
बाहेरच्या जगाचा kantala आला आणि स्वत: मध्ये रमवास  वाटलं तर  कॅरा व्हैनचा दरवाजा बंद करून घ्यायचा, पडदे ओढून घ्यायचे आणि आतल्या मंद प्रकाशात आपलं आपलं जग तयार करायचं . वाटलं तर लिहायचं, वाचायचं, संगीत ऐकायचं नाहीतर डोक्यावरून पांघरून घेऊन झोपून जायचं....
स्वदेश मधल्या शाहरुखला पहिल्या पासूनच मला अशी कॅरा व्हैन हवी होती. आणि म्हणूनच स्टार्टर मारला की माझ्या गाडीत सतत एकच गाणं वाजत असत," युही चलाचल राही ..युही चलाचल राही .." असच चालता चालता आज मी परशुरामाची भूमी पाहतोय, उद्या मला हिमालयातली  स्पिती vally  बघायची आहे, पधारो म्हारे देस म्हणून आमंत्रण करणारा राजस्थान पालथा घालायचं, मोदिकाकांनी खरच गुजराथचा कायापालट केलाय का ते ग्रामीण भागात फिरून शोधायचं... अशावेळी माझी ही मैत्रीण व्हैन मला साथ देणार.... फिरून फिरून दमलो की झोपायला कुशन देणार, समुद्रावरच्या सूर्यास्ताला गरम चहा देणार...
'tink tink ..tink tikn ..'


 SMS अलर्ट  टोन वाजला आणि मी दचकून जागा झालो. डोळे चोळतच SMS वाचला ...
" येताना दुध आणि अंडी घेऊन ये." - बायको. 
वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या  कॅरा व्हैनला  कचकन ब्रेक लागला...
ऑफिस  मध्ये आज फारसं  काम नव्हत म्हणून जरा  डोळा लागला होता वाटत ... 
तुम्ही  पण राव  लगेच विश्वास ठेवलात  ! बायकोला सोडून अशी व्हैन घेऊन वाट्टेल तिथे भटकायला जाण्याची कलंदरगिरी कधी प्रत्यक्षात   करता येते का???
फक्त आज ऑफिस मधली संध्याकाळ  मस्त गेली म्हणायची...
चला ! दुकान बंद व्हायच्या आत दुध आणि अंडी घेऊन घरी पोचायला हवं.

Monday 9 May 2011

चिखलाचे गोळे

आमच्या शाळेचा युनिफोर्म कसा असावा ह्याचा शाळा सुरु करणाऱ्या आजीबाईनी म्हणे नीट विचार केला होता. आणि मातीत लोळल तरी चटकन लक्षात  येणार नाही अशी मळखाऊ रंगाची pant  आणि मुलींसाठी त्याच रंगाचा फ्रॉक, असा आमचा युनिफोर्म मुद्दाम डिझाईन करण्यात आला होता. त्यात ८वी ते १०वी च्या मुलींना फ्रॉकच्या खाली सलवार घालणं सक्तीचं केलं होतं. हे combination जाम विनोदी वाटायचं तेंव्हा.. पण विद्यार्थ्यांना वर्गात, मैदानावर वावरतांना, धावतांना , उड्या मारतांना अंगावरच्या कपड्याची अडचण वाटू नये असं आजीबैंना वाटत असावं. ह्या पार्श्वभूमीवर आजकालच्या international , Universal schools कडे  पाहिलं  की तिथे शिकणाऱ्या मुलांची कीव येते. युनिफोर्मच्या नावाखाली पांढरे स्वच्छ कपडे, ब्लेझर्स आणि मुलींना तर चक्क मिनी स्कर्ट्स दिले जातात. पोरं रुबाबदार दिसतात म्हणून पालक खूष आणि शाळेची प्रतिष्ठा वाढते म्हणून संस्था चालकही खूष. पण मुलांचं काय? ती बिचारी स्वच्छ कपडे सांभाळत एखाद्या रोबो सारखी शाळेत वावरत असतात. आणि हिवाळ्याचे दिवस सोडता मुलांना टाय किंवा ब्लेझरची सक्ती करणे तर अमानुषच    आहे.  आणि गुडघ्याच्या जरा वरपर्यंतचे स्कर्ट्स घातलेल्या किशोरी ते कुमारिका वयाच्या त्या निसरड्या प्रवासातल्या मुली उठता बसताना, लोखंडी जिना चढता उतरतांना नको तेवढ्या conciou होतात. मैदानावर जाऊन मोकळेपणाने खेळण्याचा तर प्रश्नच येत नाही. अगदी श्रीमंती शाळांचं एकवेळ ठीक असावं , तिथे म्हणे 'स्पोर्ट्स युनिफोर्म ' वेगळा असतो. पण prestige  issue म्हणून त्यांचं अंधानुकरण  करणाऱ्या  मध्यमवर्गीय शाळांचं काय? तिथल्या पालकांना कुठे परवडतात दोन दोन युनिफोर्म्स?  अशावेळी प्रश्नं पडतो की स्मार्ट दिसण्याच्या नादात आपण त्यांचं लहानपण  'फास्ट फोरवर्ड' तर करत नाही आहोत ना? ? ?
ह्या प्रश्नाने डोकं फिरलेलं असतांनाच एका international school चे ' picnic coordinator ' छुट्टी टूरिझम च्या कॅम्प साईटवर भेटायला आले. टेकडीची वळणं कशीबशी पार करत आलेल्या AC कार मधून उतरले, आमच्या गड्याने केलेला माठातला पाहुणचार नाकारून जवळच्या बाटलीतल पाणी प्यायले. "We are looking for a comfortble and  hyginic picnic place for the students of our school..."
" International school... !"
coordinator साहेबांनी अगदी अभिमानाने सांगितले. मुलांना उधळायला छुट्टी हिल्स सारखी दुसरी जागाच नाही, असं म्हणत मी त्यांना जागा दाखवू लागलो. झाडं, तळं, डोंगर, कोंबड्या, गावठी कुत्र्याची पिल्लं, मोठ्ठं मैदान, बैलगाडी असं सगळं काही दाखवलं. तर साहेबांनी विचारलं, " Don't you have A.C. here? " " No swimming pool?" " And what the hell ! toilets are not attached to the rooms?"  
साहेबांच्या सगळ्या प्रश्नांना आमच्या रग्गेल कॅम्प साईटने स्वत:च नकार दिला. मी म्हटलं (मनात) मुलांना पिकनिकला आणणार आहात की सेमिनारला? मग त्यांना त्या international खुराड्यातून बाहेर काढून मोकळ्या हवेत तंबूत एकमेकांना चिकटून झोपुद्या की एखाद दिवस, अनवाणी पायांनी मातीत चालुद्या... हे सगळं शहरात मिळत नाही म्हणुनतर ही कॅम्प साईट खास मुलांसाठी राखून ठेवलीये. पण 'दाग  अच्छे होते हैं..' हे मान्य नसलेल्या comfort  अन hygeine  ची गुलामगिरी पत्करलेल्या साहेबांनी आपली कॅम्प साईट reject केली आणि T.A.D.A. चा हिशोब मनात करत ते शहराच्या कोलाहलात निघून गेले.  

इथल्या मातीत लोळायला, पाण्यात डुंबायला, कोंबडीमागे धावायला मुलंच येणार नसतील तर हा सगळा खटाटोप व्यर्थं आहे असा नैराश्याचा विचार करून आम्ही 'छुट्टी हिल्सच्या' संकल्पने' पासूनच सुट्टी घेण्याच्या विचारात असतांनाच Horizon च्या क्षितिजावर एक आशेचा किरण दिसला. Horizon Academy नावाच्या शाळेतून चौकशी झाली, त्यांच्या विद्यार्थ्यांना सहली साठी छुट्टी हिल्सवर पाठवण्या बद्दल. ह्यावेळी मात्रं आम्ही सावध पणे आधीच सांगून टाकलं की छुट्टी हिल्स हे resort  नसून कॅम्प साईट आहे. इथे मुलांच्या सुरक्षिततेची  संपूर्ण काळजी घेतली जाते आणि निसर्गाच्या सानिध्यात मोकाट उधळण्याची संधी दिली जाते. Surprizingly त्यांच्या डायरेक्टर बाईंना Hygine च्या किटानुन्चा  अजिबात त्रास नव्हता. त्या म्हणाल्या पोरांना चिखलात माखवून आणलंत तरी चालेल पण त्यांना मजा आली पाहिजे. Bingo ! आमची शाळा स्थापन करणाऱ्या आजीबाई  सारखा विचार करणारी माणसं शाळांमधून आहेत तर अजून. 'दाग स्कूल की इमेजसेभी  अच्छे होते हैं.. ' हे समजण्याची कुवत   असणारी माणसं अखेरीस भेटली होती, मग त्यांच्या मुलांना छुट्टी चा एक परिपूर्ण अनुभव द्यायचा असं ठरवून  आम्ही कामाला लागलो. पिकनिकची तारीख ठरली, सगळी तयारी झाली आणि पाठीवर छोटीशी sack   आणि वाटर bag ला हेलकावे देत मुलं छुट्टी हिल्सवर येऊन धडकली.  
दाढी वाढवलेला माझा अवतार बघून माझ्यासमोर अगदी शिस्तीत वावरू लागली. पण आज आपण किल्ले बनवणार आहोत आणि मातीत खेळणार आहोत असं सांगितल्यावर त्यांनी मला त्यांच्यात घेतलं आणि हा आपलेपणा शेवटपर्यंत टिकवला. मातीच नाव ऐकताच पोरांचे चमकलेले चेहरे पाहून त्यांच्या टीचर लोकांना जरा टेन्शन आलं. पण आपल्या ताई- दादांनी सूत्रं हातात घेतल्यावर त्यांनीही बिनधास्त  'मुल' होऊन घेतलं.
खाऊ खाऊन  झाल्या नंतर मुलांना जंजिरा किल्ल्यावरचा एक माहितीपट दाखवण्यात आला. बुरूज कसा असतो? तटबंदी कशाला म्हणतात? किल्ल्याच्या सुरक्षेसाठी काय उपाय केले जायचे? अशा प्राथमिक गोष्टींची माहिती देऊन त्यांच्या imagination च्या गाडीला जरासा धक्का मारून दिला..

त्यांच्या समोरचं सगळ्यात पाहिलं टास्क होतं ते आपली टीम तयार करण्याचं... त्यानंतर किल्ला बनवण्यासाठी योग्य जागा निवडण्याचं... किल्ला बांधणी साठी समान गोळा करण्याचं... माती भिजवून चिखलाचे गोळे घेऊन येण्याचं... मग किल्ला बनवून त्याला सजवायचं.... आणि शेवटी कौतुकाने बघायला आलेल्या एका आजोबांना आपला किल्ला समजावून सांगायचा....
"हरं हरं महादेव" चा गजर होताच टीम्स पडल्या आणि Horizon चे मावळे कामाला लागले. काही भिंतींच्या आधाराने, काही खांबांच्या भोवतीने तर काही स्वत:च्या हिमतीवर मोकळ्या मैदानात, असे दगड खापरांचे सांगाडे उभे राहू लागले. आणि अखेर तो क्षण आला... तापलेल्या मातीचं फावड्याने आळं करून दादाने त्यात पाणी सोडलं.... मातीच्या सुवासाने विखुरलेल्या टीम्स मधल्या पोरांना बोलावून आणलं आणि पोरं चिखलावर तुटून पडली...
अंगातल्या युनिफोर्मची, शाळेच्या शिस्तीची, डाग, किटाणू कशाचीच परवा न करता ते 'गोऱ्या'चे दास माती तुडवत होते. मळलेली माती अंगाखान्द्यांवरून वाहत किल्ल्यांच्या  भिंती थापत होते,  बिसलरीच्या बाटलीची तोफ झाली होती, फुटलेल्या फुग्याच्या चिंधीचा झेंडा झाला होता. माचीसच्या काड्यांच कुंपण पडलं होतं, करवंटीची विहीर झाली होती तर पालथ्या कुंडीच्या खापराचा बुरूज झाला होता. 
दरम्यान एकदाही मुलांना शिट्टी वाजवून  कंट्रोल  करावा लागलं नव्हतं की मुलांनी कुणाची तक्रार पण केली नव्हती. उलट एक किल्ला जरासा मागे पडत होता तो त्यांच्या teachers  चा होता.


शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुलांनी किल्ले पूर्ण केले. आजोबांना त्यांच्या मेकिंगची संपूर्ण माहिती दिली.  गळ्यातली I - कार्ड्स आणि प्रत्यक्ष चेहरेही चिखलाने इतके माखले होते की एकमेकांची ओळखही पटत नव्हती पण आज त्यांना स्वत:चीच एक वेगळी ओळख पटली होती. मुलांना त्याक्षणी  असं काही वाटत नव्हत पण युनिफोर्म च्या कवचातून बाहेर पडून ती आज त्यांच्या ओरीजनल रूपात आली होती.
असे हे चिखलाचे गोळे बस मध्ये भरून आपापल्या घरी सोडायचे म्हटल्यावर बसवालेकाका कटकट करतील, पण ते म्हणाले, " काही प्रोब्लेम नाही, डायरेक्टर madam ने ह्या पिकनिक नंतर खास 'Bus washing allowance ' मंजूर केलाय. " आता मात्रं त्यांच्या डायरेक्टर मादाम बद्दल मला खरच आदर वाटू लागला. 'लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांना आकार द्याल तसी ती घडतात.' हे टिपीकल वाक्य शाळेच्या दर्शनी भागावर रंगवायच आणि प्रत्यक्षात मात्र मुलांना माती पासून तोडायचं... अशा भयानक वाटे वरती जाणाऱ्या international कोंड वाड्यांच्या  तुलनेत Horizon  च्या क्षितीजवर खरोखर आशेला जागा आहे. :-)

Wednesday 4 May 2011

Ana Tai ...

 Ana  Kone  Borakko ! 
हे तिचं  नाव.. उच्चारायला तितकंसं सोपं नाही म्हणून फक्त   'Ana'... वय २६ वर्षं, सध्याचा मुक्काम paris (फ्रांस) , जन्मगाव- आयव्हरी कोस्ट, पूर्व आफ्रिका.. भारतात येण्याचं निमीत्त- मैत्रीणीच लग्न. माझी बायको अन तिची मैत्रीण सांस्कृतिक देवाण- घेवाणीच्या कार्यक्रमांतर्गत paris ला जाऊन आल्या. Paris शहरात त्यांच्या यजमान असलेल्या Borakko कुटुंबातील थोरलं कन्यारत्न म्हणजे Kone काकूंची मोठी मुलगी म्हणजे ही Ana.. ह्या दोघी Ana च्या घरी मुक्कामी असतांना त्यांची छान मैत्री झाली. आणि आपल्या भारतीय मैत्रिणीच्या लग्नाला जायचच असं Ana ने तेंव्हाच  ठरून टाकलं. आफ्रिकन वंशाच्या, Paris मध्ये राहणाऱ्या त्या पोरीला काय भारताची ओढ होती कोण जाणे? 
आणि एके दिवशी मैत्रीला जागत Ana भारतात आली,लग्नसोहळ्यात सहभागी झाली, साडी नेसून मिरवली, इंडियन मैरेज चा थाट पाहून भरून गेली, मैत्रिणीच्या पाठवणीच्यावेळी काकवांच्या सूरांत सूर मिसळून प्रामाणिकपणे रडली. आणि लग्न घरातून मोकळी झाली तशी 'मला इंडिया बघायचाय' म्हणाली. तिच्या दोनमेव भारतीय मैत्रिणींपैकी एक सासरी गेल्या मुळे उरलेल्या मैत्रिणीचा नवरा म्हणून हि ' इंडिया दर्शनाची' जबाबदारी अर्थातच माझ्यावर येऊन पडली. अर्थात ती मी आनंदाने स्वीकारली. पण ह्या आनंदाचा रुपांतर टेन्शन मध्ये व्हायला फारसा वेळ लागला नाही. कारण दुसऱ्या दिवशी जेंव्हा Ana कॅमेरा , वही, पेन घेऊन तयार झाली तेंव्हा हातात असलेल्या दीड दिवसात तिला कोणता इंडिया दाखवायचा हा अचानक काळजीचा विषय होऊन बसला. तिचं परतीच्या विमानाचं तिकीट काढलेलं त्यामुळे वेळ कमी परिणामी फिरायला जायचे पर्याय उरले फक्त नाशिकच्या आसपासचेच..... एरवी ऑफिस ते घर एवढाच प्रवास करणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला फिरायला जायची ठिकाणं आठवेच ना! रामकुंडा, पंचवटी परिसर म्हणावा तर त्या गल्ली बोळात कोण गाडी घालेल म्हणून मी तिकडे फारसा कधी फिरकलोच नव्हतो. (  हो! अमर्धाम्ला जायचं तरी आम्ही द्वारका वरून फिरूनच जातो..:-)  ) पांडवलेणी दाखवावीत तर गेल्या कित्येक वर्षात मीच तिथे गेलेलो नव्हतो, त्र्यंबकला जावं तर ह्या पाहुनीला घेऊन दर्शनाच्या रांगेत कोण उभं राहील? बरं V. I.P. दर्शनाचा मार्ग आपल्याला माहित कुठे होता? परिस्थिती बिकट असली तरीही ह्या पलीकडे नाशकात दाखवणार तरी काय???  अखेर नाईलाजाने Ana इतकेच अनभिज्ञपणे आम्ही नाशिक उर्फ इंडिया दर्शनाला निघालो. राम ..राम.. म्हणत पंचवटी फिरलो. दंडकारण्य, पाच वटवृक्ष, १२ वर्ष्यांनी उघडणारा देऊळ, The bigest hindu religious gathering नावाने ओळखला जाणारा कुंभमेळा, असं सगळ इंग्रजीतून सांगत राहणं वाटतं तितकं सोपं नसतं.
बरं.. त्यात जुन्या नाशकातल्या पोरांनी Ana ला पाहून मारलेले टोमणे, स्कॅन केल्या सारख्या त्यांच्या नजरा, रंगावरून केलेली कुचेष्टा.. हे सारा पचवण खरच सोपं नव्हतं.   देवळांच्या रूपाने Indian culture दाखवण्याच्या प्रयत्नात दिवस मावळला. मला वाटलं देवळांची स्थापत्यकला, गंगेवरची नागडी उघडी पोरं पाहून, Indian culture  म्हणून त्यांचे फोटो काढून पाहुनी खूष होईल, पण सोमेश्वर जवळच्या बालाजी मंदिराच्या सभामंडपात माझा shocking  भ्रमनिरास झाला.  नव्यानेच बांधलेल्या ह्या देवला बद्दल माहिती सांगून मी Ana ला गाभाऱ्यात यायला सांगितलं... तर जरास  कचरतच तिने मला विचारलं," Is it OK if I come inside? "   आता एका आफ्रिकन मुलीने जोडे बाहेर काढून गाभार्यात जायला काय हरकत होती??? म्हणून मी म्हटलं   ' जा बिनधास्त..!'  " No.. but... as I belongs to Islam, ह्या पुजाऱ्यांना काही objection तर नसेल ना ?
Ana आणि मुसलमान???
नाही म्हणजे हरकत काहीच नव्हती, ना माझी तिने इस्लाम मानण्यावर, ना पुजार्यांची तिने बालाजीचे दर्शन घेण्यावर. पण तिने दोन्ही हातांची बोटं गुंफून दारातूनच नमस्कार कि काय तो केला अन मागे वळली. पण आपल्याला काही चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवता आलं नाही. आपल्या ओळखीतले मुसलमान म्हणजे शेख,खान झालाचतर  पठाण. आपल्याकडच्या खाला, आपा सारखी ती अजिबातच दिसत नव्हती ना हो... आणि आफ्रिकन वंशाची, Paris    मधल्या पाश्चीमात्य संस्कृतित वाढलेली Ana ही इस्लाम मानणारी होती असं तोपर्यंत कोणाला वाटलं पण नव्हतं. आणि मैत्री करताना कशाला लागतो धर्म ?  अर्थात तिच्या धर्म बद्दल बाकी काहीच बिघडलं नव्हतं. मात्र माझा प्रोब्लेम अधिक गडद झाला होता. म्हणजे अजून देवळं  दाखवलीत  तर ती बिचारी बिचकत बिचकत बघणार.
 त्यातच मागे एकदा पार्वती खानने त्र्यम्बाकेश्वराचे दर्शन घेतल्याचे काही स्थानिकांच्या पचनी न पडल्याची घटना मी ऐकून होतो. त्यामुळे फायनली देवळांचा अन पर्यटन स्थळांचा नाद सोडून aamhi  तिला सुला वाइंस ला ( famous  winery in  nashik ) घेऊन गेलो.वाटलं वाईन - बिईन पिऊन तिला बरं वाटेल , तर म्हणे ," मी नाही प्यायले तर चालेल का? ते ... इस्लाम    मध्ये मद्य वर्ज्य असतं ना !"  आता मात्रं बायकोच्या ह्या परदेशी मैत्रिणी बद्दलच्या माझ्या मध्यमवर्गीय संकल्पनांना सुरुंग लागत होते. नशीब माझं  Ana ला माझी गोची समजली आणि तिने मग स्पष्ट सांगून टाकलं की तिला धार्मिक किंवा टिपिकल पर्यटन स्थळं बघण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, उलट तिला ग्रामीण भारत बघायचा होता . ( मग मध्ये एक भला मोठा पॉज गेला)
असा भारत पाहण्या साठी एक जन्म देखील पुरणार नाही हे सुदैवाने तिला मान्य होतं. पण आपल्या पहिल्या भारत भेटीत तिला गांधीजींच्या त्या ग्रामीण भारताची एक झलक तरी बघायचीच होती. तोवर माझ्या लक्षात  आलं होतं की ही पोरगी काहीतरी वेगळा विचार करणारी आहे. आधी तोंड उघडला असतं तर देवळं पाहण्यात दिवस वाया घालवला नसता ना. आता उरलेल्या काही तासांत भारत कसा दाखवू , जो अजून मलाच पुरेसा समजलेला नाही.
वडिलांनी शिक्षणा साठी गाव सोडलं तेन्वाच आमच गाव तुटलेलं, बायकोचं गाव म्हणावं तर ते गोडे काठच  जुनं नाशिक खूप विचार करूनही गाव गाव म्हणता ' नाशिक ग्रामीन' पलीकडे काही सुचेना.... अचानक सुचलं, ' वा घे रा.'
मी ज्या रचना विद्यालयात शिकलो त्याच संस्थेची वाघेर्याची आश्रम शाळा. .. नाशिक पासून ३६ कि.मी. अंतरावरची... ४५० आदिवासी मुलांना आपल्या कुशीत वाढवत गावाबाहेरच्या टेकडीवर एकटीच उभी असलेली. शाळा गावातली, मुलही गावाकडचीच   आणि  शिक्षकही ग्रामीणच.. मी म्हटलं असा एकवटलेला ग्रामीण भारत Ana ला दाखवण्याची ह्यपेक्ष उत्तम जागा नाही. शाळेशी असलेल्या नाट्य मुले रचनाच्या आम्हा माजी विद्यार्थ्यांच्म तिथे कधीही स्वागतच असतं.  Ana ला पण ही कल्पना आवडली.
'मा. श्री. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रम शाळा, वाघेरा, ह्या पत्त्यावर आम्ही साधारण मावळतीला पोहोचलो. मुलं तेंवा जेवणाच्या हॉल मध्ये होती. मुख्याध्यापाकांसाहित सार्वजन शाळेवरच मुक्कामी असल्याने अचानक आलेल्या पाहुण्यांची त्यांना फारशी अडचण झाली नाही. सर्वांची Ana शी ओळख  करून दिली. गावाकडे जशी फोन करून येण्याची पद्धत नसते पण तरीही आदरातिथ्य मात्रं जोरदार होतं. तसाच प्रेमाचा पाहुणचार Anala ही मिळाला.
रीती प्रमाणे पाहुण्यांना शाळा दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. संध्याकाळची वेळ असल्याने रिकामे वर्ग दाखवण्यात अर्थं नव्हता, त्यामुळे भिंतींवर रंगवलेले सुविचार, परिसरात मुलांनी केलेली लागवड असं सगळं दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. परदेशी पाहुनीला शाळा दाखवायची म्हटल्यावर अर्थातच त्याची जबाबदारी इंग्रजीच्या शिक्षकांवर येऊन पडली.
नुकताच  D.Ed. झालेला एक तरुण शिक्षक.. विदेशी तरुणीशी प्रत्युअक्श बोलण्याचा त्याचा पहिलाच अनुभव. पण त्याच्या परीने इंग्लिश मध्ये बोलत , कधी हातवारे, खाणाखुनांचा   वापर करत त्याने अत्यंत आत्मविश्वासाने शाळा नुसती दाखवलीच नाही तर समजावून पण  सांगितली. त्या दोघांतला तो संवाद मी लाख प्रयत्न केले तरी शब्दात मांडू shakat  नाही. पण देवलांपेक्षा Ana आश्रम शाळेत रमली होती. का? तर ह्याच 'का?' चं उत्तर शोधात आम्ही दोघा नवरा बायको त्यांच्या मागे मागे फिरत होतो.  Ana चा माझ्या पेक्षा जास्त सहवास लाभलेल्या माझ्या बायकोने मग माहिती पुरवली कि Ana ला पाश्चिमात्य देशन्पेक्षा भारता सारख्या विकसनशील देशांबद्दल जास्तं आकर्षण आहे. सध्या जरी फ्रांस मध्ये रहात असली तरी ती मूळची आफ्रिकेतल्या आयव्हरी कोस्त नावाच्या लहानश्या देशातली. फ्रेंचांची गुलामगिरी सहन केलेला एक गरीब देश. तिच्या वयाच्या १५ व्या वर्षी ती कुटूंबा बरोबर परीस ला स्थलांतरित झालेली. ऐन उमेदीच्या काळात कृष्णवर्णीय  म्हणून अवहेलना सहन करावी लागलेली. कातडीचा रंग जवळचा म्हनुन्की काय तिला आपला देश जास्तं जवळचा वाटलं असावा... आपल्याला जे इंग्रजां बद्दल वाटतं तेच तिला फ्रेंचन बद्दल वाटत होतं. आपल्या सारखीच त्यांनी पण संघर्ष करून गुलामगिरी झुगारून दिलेली. आणि आता आपलं वेगळं अस्तित्वं सिद्ध करू पाहणारे देश म्हणून तिला आपापसात साम्य  वाटत असावं. आणि म्हणूनच मैत्रिणीच्या लग्नाच  निमित्त साधून, पदरचे पैसे खर्च करून इतक्या दूरवर आलेल्या Ana  बद्दल आता मला आदर वाटू लागला होता.
तेवढ्यात साधारण ५ वीच्या वर्गातली दोन मुलं जेवणाचं ताट  विसळायला म्हणून बाहेरच्या नळावर आली. अंधार पडतांना शाळेत आलेले पाहुणे पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं असावं. पण त्यहिपेक्ष जास्त आश्चर्यं त्यांना इंग्रजीच्या सरांबरोबर बोलणार्या त्या वेगळ्याच दिसणाऱ्या मुली बद्दल वाटत होतं. मग काय.... " ए..! आपल्या साळत    कोण आलंय पाय.." असं म्हणत आख्खी  शाळा व्हरांड्यात. ४५० नजरा Ana वर रोखलेल्या.. कान टवकारलेले... " चालारे आत व्हा!", - मुखाध्यापक. मुलांचं त्यांच्या कडे पूर्णं दुर्लक्ष.. आयुष्यात पहिल्यांदा आफ्रिकन मुलगी पाहतानाच्या कुतूहलापुढे मग मुख्याध्यापकांची माघार.. सरांनी मुलांना जवळ बोलावलं. पण पोरं statue  ..नजरा Ana वर.. तोंडांचे आ वासलेले.. तिचा चकचकीत काळा रंग, रंगीत कपडे, बारीक विणलेल्या वेण्या.. आश्रम शाळेतल्या पोरांसाठी सारचं नावं होतं. तेवढ्यात संध्याकाळच्या प्रार्थनेची घंटा वाजून पोरं भानावर आली. शाळेच्या मधल्या पटांगणात प्रार्थना झाली. पोरांच्या समोर तातडीने काही  खुर्च्या मांडून त्यावर Ana  , मुख्याध्यापक आणि बायको बसल्या. पोरांना पाहून Ana  खूष.. बोलायला उत्सुक.. पण पोरं मात्र गोंधळलेली.. शेवटी सर आले धावून.. त्यांनी Ana ची ओळख करून दिली. आणि पुढची सूत्रं घाईने माझ्याकडे सोपवली. नेहमीच्या जाण्या येण्यामुळे माझी मुलांशी चांगली ओळख होती. 
तरीही सगळ्यांच्या नजरा फक्तं Ana वरच.. मी सुरुवात केली, फ्रांस नावाच्या देशातून Ana विमानाचा प्रवास करून आपल्याला भेटायला आली आहे. आणि तिला तुमच्याशी मैत्री करायची आहे, गप्पा मारायच्या आहेत.
" ही.. ही .. फी.. फी.. फी...! त्यांना मराठी येतं तरी का?" मुलांचा पहिला स्मार्ट प्रश्नं.
" पण इंग्लिश येतं न!" - मी.
मुलांमध्ये शांतता...
(पुन: सर आले धाऊन) सर- " मुलांनो तुम्ही मराठीत प्रश्नं विचारा, योगेशदादा दुभाषाच काम करतील." (म्येला योगेशदादा..)
सरांचं वाक्यं संपायचा उशीर... प्रश्नांची सरबत्ती सुरू. मुलांच्या मनात Ana बद्दल प्रचंड कुतूहल होतं. तिचा देश, विमानाचा प्रवास, आवड-निवड असे प्रश्नं मला अपेक्षित होते. पण स्मार्ट प्रश्नं क्रमांक दोन. (अर्थात मुलींच्या बाजूने) " Ana ताईचे केस खरे आहेत की खोटे?"
संवाद साधण्या इतकं माझं इंग्लिश बरं आहे हो पण ह्या प्रश्नावर मी खरंच blank झालो. हा काय प्रश्नं होता? एकतर मुलींनी अगदी सहजरीत्या Ana Kone Borakko ची Ana ताई करून टाकली होती. ह्याचं मला कौतुकही वाटत होतं आणि हसू देखील येत होतं. Ana माझ्या बायकोला 'कीर्ती ताई ' संबोधत असल्याने त्यांच्या फ्रांस दौर्या दरम्यान तिला 'ताई' शब्दाचा अर्थं आणि नातं पक्कं माहित होतं. " Oh..! she called mi 'Taai' ?" असं म्हणत Ana च्या डोळ्यात पाणी. डोळे टिपता टिपता तिने मी भाषांतरित केलेला प्रश्नं ऐकला आणि बारीक विणलेल्या वेण्या मोकळ्या सोडून आपले केस खरे असल्याचं सांगितलं. अशाप्रकारची केशरचना करणं ही केवळ fassion  नसून तो आमच्या संस्कृतीचा भाग असल्याचं ती म्हणाली.
स्मार्ट उपप्रश्नं - "पण मग अशा वेण्या घालायला किती वेळ लागतो?"
Ana - " अ..! आत्ता सुरुवात केली तर साधारण पाहते पर्यंत होईल पूर्णं." 
"अराब्बाप !" - मुलं.
स्मार्ट प्रश्नं क्रमांक तीन, " Ana ताई, तुमचं आडनाव काय आहे?" 
" Ana हे माझं नाव, Kone हे माझ्या आईचं नाव आणि Borakko हे आमच्या मूळ गावाचं नाव. आमच्यात आडनाव असं काही नसतं. त्याऐवजी गावाचं नाव लावतात आणि मातृसत्ताक पद्धत असल्याने आईचं नाव लावतात. " (मोठ्या मुलांना मातृसत्ताक पद्धत माहित होती छोट्यांना नुसतीच गम्मत वाटली.)
गप्पा रंगत होत्या. Ana च्या धाकट्या भावाचं नाव 'याक्कू' आहे हे ऐकून लहान मुलांना अजूनच गम्मत वाटली आणि ती लगेच एकमेकांना 'याक्कू' नावाने हाक मारू लागली.
पुढचा स्मार्ट प्रश्नं - "तुम्हाला किती भाषा येतात?"
Ana ," एकूण तीन भाषा चांगल्या येतात. एक म्हणजे माझी मातृभाषा  असलेली आफ्रिकन भाषा, दुसरी फ्रेंच आणि तिसरी इंग्लिश. आणि हो, मी शाहरूख खांचे सगळे सिनेमे पाहते त्यामुळे आता थोडी थोडी हिंदी पण समजते." मग मुलांच्या आग्रहावरून Ana ने हिंदीतून ' नमास्ते' आणि फ्रेंच मधून 'बोन्जूर' म्हणून मुलांना अभिवादन करून दाखवलं . 
 मुलं पुढे पुढे सरकत Ana च्या अगदी जवळ येऊन बसली होती. आणि तिला 'ए Ana  ताई ' अशी एकेरीत हाकही मारू लागली. मग Ana  नेही त्यांना काही प्रश्नं विचारले. पोरांनी पण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने उत्तरं दिली. आता भाषा हा फारसा अडसर उरलाच नव्हता. मध्येच ६वीव्ह्य वर्गातल्या एका लहानग्याने विचारलेल्या एका प्रश्नाने धम्माल उडवून दिली. त्याने विचारलं, "Ana ताई, दक्षिण आफ्रिकेतल्या paris गावातून इतक्या लांबून आलीस... तर तुझं विमान कसं होतं?" त्यानंतर ६वीच्या  वर्गाला भूगोल शिकवणाऱ्या बाईंकडे बघून इतर शिक्षक जोरजोरात हसत होते. आणि विमानाचा स्पीड किती होता, रंग कसा होता, असल्या प्रश्नांची उत्तरं देतादेता Ana च्या चेहर्याचा रंग उडाला होता. मोठ्या मुलींपैकी कोणीतरी मग Ana ला गाणं म्हणून दाखवण्याचा आग्रह केला. Ana  हुशार, तिने 'आधी तुम्ही म्हणून दाखवा अशी अट घातली. दोन मुली चटकन पुढे आल्या, हाताची घडी घालून , पायाने ठेका धरत धिटाईने गाणं म्हणून गेल्या. Ana ने पण मग तिच्या भाषेतलं एक अंगी गीत गात शब्द पाळला. मधून मधून ती त्या ओळींचा अर्थ पण समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या ह्या अन्गैवर प्रतिक्रिया देतांना एक ९वीतली मुलगी म्हणाली, " गानं आयकून आईची आठवन झाली." आफ्रिकेत जन्मलेली, Paris हून आलेली Ana , तिच्या भाषेत अंगाई गाते आणि त्यातला एकाहीशब्द न समजणाऱ्या ह्या शाळकरी  मुलीला दूर आदिवासी पाड्यावर राहणारी आपली 'माय' आठवते.. ? हे मानुसाकीच्म कनेक्शन लॉजिक च्या पलीकडचं आहे.

मधल्या वेळात ह्या भारावलेल्या क्षणांची आठवण म्हणून मी फोटो काढत होतो. तोवर अंधार पडून गारठा वाढत चालला होता. सर पुन: एकदा धून आले आणि त्यांनी गपांच्या कार्यक्रमाचा समारोप केला. शेवटची चार पाच वाक्यं Ana  रडतंच बोलली. आई -वडिलांपासून दूर राहून, मर्यादित सुविधांमध्ये शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ह्या मुलांचं तिला कौतुक वाटत होतं. " आज तुमच्या रूपाने मला खूपसारे इंडियन फ्रेंड्स मिळाले." अस्म तिने जाहीर करताच आमची स्मार्त पोरं तिला 'Same to you' पण म्हणाली. त्यांनी आग्रहाने Ana चा पत्ता, ई- मेल आणि फोन नंबर लिहून घेतला. Ana ने पण त्यांना आयफेल tower चं पोस्टर पाठवण्याचं कबूल केलं.
 रंगलेल्या कार्यक्रमाची बळजबरीने सांगता करून मुलांना आपापल्या खोलीत जायची सूचना देऊनही त्यांचा पाय निघत नव्हता. चार -पाच जणींच्या बुजर्या गटाचं नेतृत्व करत एक छोटी माझ्या जवळ आली आणि म्हणाली," दादा! आम्हाला तिला हात लाऊन बघायचय." काहीही न बोलता मी त्यांना Ana च्या जवळ नेलं. त्यांनी तिच्याशी हात मिळवले, केसांना, गालाला स्पर्श केला. देश, प्रांत, धर्म, भाषा, वर्ण असे सारे भेद मागे टाकत आपल्या निरागस हातानी एक माणसाचा बच्चा दुसर्या माणसाला फक्तं स्पर्श करून नातं जोडत होता. आणि असा हा ' माणुसकीचा सोहळा' मी भरभरून अनुभवत होतो.