Sunday 17 April 2011

दलीतातला बामन्या

अनुपम खेर यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठींबा देतांना राज्य घटने बद्दल जे उद्गार काढले, त्याला विरोध करणा कसं चुकीचं आहे ह्या बद्दल मी माझ्या गेल्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं . दालीतेतारांच्या अनेक प्रतिक्रिया मला त्यावर मिळाल्या पण मी आवर्जून वाट पाहत असलेल्या दलित समाजातून मात्र मला फक्तं एकाच प्रतिक्रिया मिळाली, आणि ती होती माझ्या आईची;
अत्यंत तिखट अशी तिची प्रतिक्रिया होती. "अनुपम खेरांना हवा ते बोलण्याचा अधिकार आहेच पण म्हणून काय त्यांनी बाबांचा अपमान करायचा  का? आणि त्याचं मरूदे तुला आपल्या समाजाच्या विरोधात बोलतांना लाज नाही का वाटत ? ज्यांच्या मुले आज इथपर्यंत पोहचलात त्यांच्या बद्दल जराही अभिमान वाटत नाही का? समजा साठी चांगलं काही करता येत नाही तर निदान   वाईट तरी करू नका......"(आणि बरंच काही)
मातोश्रींच्या ह्या कडक प्रतिक्रियेनंतर मात्र इतर समाजबांधवांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणं मी सोडून दिलं. कारण मला जन्म देणाऱ्या, घडवणाऱ्या आईचं म्हणणं असं असू शकतं आणि तिला मी समाज विरोधक, जातीची लाज वाटणारा असा वाटू शकतो तर इतरांची प्रतिक्रिया ह्यापेक्षा   वेगळी काय असणार? परंतु मी खरच असा आहे का? कि मी शिकलो, शहरातल्या चांगल्या समजल्या जाणार्या वस्तीत राहू लागलो, ए.सी. कार मधून फिरू लागलो, माझे उच्चार 'आनी- पानी' चे नाहीत   ह्याचा अर्थ मी ज्या समाजात जन्मलो त्याची मला लाज वातूलागली  आहे? मला वाटतं हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. एक सुशिक्षित शहरी  तरुण त्याचा दलित असण्या बद्दल काय विचार करतो ह्याचा जरासा अंदाज येऊ शकेल असं ते मत असू शकेल. पण विषयाची व्याप्ती मोठी असल्याने  'मी यंदाची आंबेडकर जयंती कशी साजरी केली' एवढ्याच पुरतं आपण बोलू. आणि त्यातून काही सापडताय का ते पाहू....
परवा शूटिंग location वर जाताना आमचा स्पॉट बॉय म्हणाला,  "काय सर! काय शॉपिंग बिपिंग केला कि नाय?"  आपले सर हे 'आपल्यापैकीच' असल्याचा ज्याला अभिमान वाटायचा असा हा आमचा spoty . त्याच्या ह्या प्रश्नाने मला जाणीव झाली कि आंबेडकर जयंती जवळ आली आहे. (हो, नवीन कपडे नवीन वस्तू खरेदी करून मोठ्या उत्साहात 'जयंती' साजरी करण्याची पद्धत आहे. )
pack up झाल्यावर घरी आलो तर आमच्या मातोश्री पुतळ्यावर जाण्याच्या तयारीत होत्या. " ते शूटिंग चे अजागळ कपडे बदला आणि चांगला काहीतरी घाला, आज चा आपला वर्षाचा सन आहे." मातोश्री. (१३ एप्रिल ला मध्यरात्री १२ वाजता सर्वांनी नवीन शक्यतो पांढरे किंवा निळे ( निळा - ज्याची दालीतेतारांमध्ये 'जयभीम कलर' म्हणून हेटाई केली जाते.)कपडे घालून गावातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ एकत्र यायचं असतं.)
पांढरा झब्बा, पांढरी चप्पल, पांढऱ्या फुलांचा हार घेऊन पुतळ्यावर जाण्या इतका उत्साह माझ्यात नसला तरी त्या ठिकाणी आवर्जून न जाण्या इतका मी माझ्या समजा पासून तुट्लेलो पण नाही.म्हणून आम्ही गाडी काढली न पुतळ्या जवळ गेलो. मूठ आवळून एका बोटाने दिशा दाखवणारे बाबासाहेब दिव्यांच्या रोष्णाईत nhale होते. (दलितेतर ज्याला " स्टेशन कुठे आहे ? ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा पुतळा समजतात , तोच तो पुतळा.)
बाबांची लेकरं वाजत गाजत पुतळ्यावर जमत होती. गर्दीतल्या बुद्धाचार्यांनी बुद्ध वंदना म्हणायला सुरुवात केली . तशा गर्दीच्या नजरा पुतळ्यावर स्थिरावल्या.... सर्व पक्षान्चे  नेते बाबांच्या सर्वात जवळ जाऊन उभे होते, त्यांच्या नजरा मात्र  मिडीयाच्या कॅमेर्यान्वरच होत्या. कोणत्याही बलाचा वापर न करता एवढा मोठा मॉब आणि तोही आंबेडकरी मॉब असा शांत उभा आहे, मला वाटतं हे दृश्य फक्त 'जयंतीलाच' बघायला मिळू शकतं.  'साधू.. साधू .. साधू... म्हणत वंदना संपली आणि बाबांच्या गळ्यात हार घालायला म.न.पा. ची ट्रोली   त्यांच्या गळ्याकडे सरसावली. प्रथम नागरिक आणि स्थायी च्या अध्यक्षिन बाईंनी बाबांच्या गळ्यात हार 'फेकले' आणि सुरक्षा रक्षकांच्या कड्यातून त्या सुरक्षित स्थळी रवाना झाल्या. हो कारण 'ती लोक वाईट असतात ' असं कोणीतरी सांगून पाठवलेलं असावं. अन्यथा ४० % महिलांचा सहभाग असलेल्या जनसमुदायामध्ये त्यांना भीती वाटायचा तसं कारण नव्हतं. (माझ्या मते जगातील सर्व  चळवळींचा   विचार केला तर सर्वात jast   महिला ह्या फक्त निळ्या झेंड्या खाली एकत्र येताना दिसतील.) पण  सगळा दोष त्यांचा नव्हता, कारण वंदना संपल्या नंतर मॉब मॉब सारखा वगुलागला होता.' बाबासाहेब कोन थे ? ? इस देश के बाप थे.' ' एकंssच साहेब बाबासाहेब.'  अशा घोषणा सुरु झाल्या. केवळ राजकीय फायद्या साठी आलेल्या नेत्यांनी मिडिया वाल्यांना पोज दिल्या न कलटी मारली. तर बाबासाहेब आपल्या बा ची property  समजणारे दलित राजकीय पक्षांचे र कार्यकर्ते चक्क जोडे घालून पुतळ्याच्या  चौथर्यावर चढून बसले होते. "आपले लोक कधी नाही सुधारणार!" अशी नाराजी व्यक्त करत बाबांना मनोभावे वंदन करत ( आमच्यात नमस्कार नसतं म्हणायचं) मातेने परतीचा मार्ग धरला.
दुसर्या दिवशी पाहते लवकर उठून अंघोळ करून नवीन कपडे घालून घरावर निळा झेंडा लावायचा असतो. पाडव्याला गुढी उभारता तसा आम्ही सकाळी झेंडा लावला. त्या भोवती रांगोळी काढली. बाबासाहेबांचा मोठ्ठा फोटो अन त्यांच्या चरणाशी  गौतम बुद्धाची छोटीशी मूर्ती अशी आरास मांडली गेली. समोर मेणबत्त्या लावल्या गेल्या. वंदना घेण्यात आली. गोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. आमच्या कडे ह्यावेळी श्रीखंड पुरी चा बेत होता. ( इतर लोक जयंतीला नेहेमी चिडवतात ' काय मग आज निळं श्रीखंड का? ' खरंच पण खाण्याचा रंगं घालून कोणी विकलं तर आमचे लोक ते निळं श्रीखंड श्रद्धेने खातील. )
मी कलता झाल्या पासून जयंतीच्या दिवशी आमच्या कडे बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित एक तरी पुस्तक आणलं जात.( म्हणूनच इतर म्हणत असतील कि आमच्या मुले वह्या - पुस्तकांचे भाव वाढलेत म्हणून..:-)  ) 
मस्त गोडाचं जेवण, भीम गीतांची सी.डी., नवीन पुस्तकाचं वाचन अशी जयंतीची दुपार गेली. संध्याकाळी पुन्हा नवीन कपडे घालून मित्र, नातेवैकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जायचं असतं अन मिरवणुकीत सहभागी व्हायचं   असतं.  ह्या ठिकाणी मात्रं  मी मागे सरलो. सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या नागरी हक्कांची वाट लावत सण साजरा करण्याची कल्पना काही केल्या मला पटत नाही. मध्य रात्री पासून बरं  असलेलं आई च माझ्या बद्दल चं मत ह्या ठिकाणी पुन्हा एकदा बदलतं. पुन्हा तेच तुम्ही फार शहाणे झालात.. तुम्हाला आपल्या लोकांची लाज वाटते. 
आपली प्रतीकं आपली माणसं आपल्या पद्धती जपत इतर कोणत्याही भारतीय माणसा प्रमाणे आम्ही पण 'जयंती ' साजरी केली. काही गोष्टी मी मनापासून केल्या, काही  आई- वडिलांना बरं वाटावं म्हणून केल्या , काही उत्सुकते पोटी केल्या. आणि काही गोष्टी मी अजिबात नाही केल्या. आता मला सांगा ह्याचा अर्थ मला माझ्या जातीची लाज वाटते असा काढावा का? माझ्या सारख्या शहरी सुखवस्तू दलिताला लाज वाटायचा तसा करांच नाही, कारण दलित म्हणून होणारी अवहेलना माझ्या वाट्याला आलेलीच नाही. हो पण आज ज्यांच्या बरोबर आज मी जात शेअर करतोय त्यातल्या राजकीय नेतृत्वाची मात्र मला खरच लाज वाटते. खरतर राजवाड्यात राहणाऱ्या माझ्या समाजबांधवांची पण वाटते, पण त्यापासून माझं मन मला आडवत   कारण नुसती लाज वाटून काय उपयोग? शिकून सवरून मी पुढे सरकलो पण त्यांच्या साठी मी काय केलं? ह्याची बोच/ जाणीव मला आहे. मिळालेय संधीचा फायदा घेत अजून पुढे जायचं की समाजाच्या भल्या साठी काही करायचं? हा प्रश्न अजून तरी सुटलेला नाही. 
च्यायला शिकलो, विचार करू लागलो हे चुकलं तर नाही आमचं? जातीचा अभिमान बाळगत typical दलिता सारख जगावं तर  बुद्धीला ते पटत नाही. म्हणून जरा विरोधात मत मांडाव तर आम्हाला 'दलीतातला  बामन्या'  ठरवतात. बघू इथवर विचार केलाय तर पुढचामार्ग पण  सापडेलच. 
कोणी काहीही म्हणो पण यंदाच्या 'जयंती' निमित्ताने असं विचारमंथन  झालं , आणि ते तुमच्या सारख्या विचार करण्याचा अवयव असणाऱ्या मित्रांशी शेअर करायला मिळालं... हेच खरं  सेलिब्रेशन. 






जय भीम..










7 comments:

  1. vastusthiti an ghalmel ani prashna changala ahe uttar milayala have pan kevha kadhi kuthe ???????

    ReplyDelete
  2. तू 'लिहिता' झालास हे फार छान झालं योगेश. स्वत:मध्ये डोकावून बघायची संधी बऱ्याच लोकांना मिळते. ती साधतात मात्र फार कमी जण. अस्वस्थता, आत्म परीक्षण यातूनच केव्हातरी साक्षात्कार होतो (असं म्हणतात - मला अजिबात अनुभव नाही).

    ReplyDelete
  3. वाचला. चांगला आहे. पण कुठल्याही गोष्टीचे उत्सवी celebration हा सगळ्यांचाच weak point आहे. कुठल्याच जातीला single out करता येणार नाही.

    ReplyDelete
  4. saglech prashna uttar dyayla sope pan gali utaravayala mahakathin aahet!

    ReplyDelete
  5. Hi !! good one.. prashna kharach vichar karayla lavnara aahe..

    ReplyDelete
  6. योगेश,
    तुझा ब्लॉग वाचून फार बरं वाटलं. तुझा ब्लॉग वाचून असं वाटलं की दलित चळवळ एक पाउल पुढे सरकते आहे. दलित चळवळीची सुरुवात झाली तेव्हा इतर कुठल्याही चळवळी समोर असतात तसे प्रश्न याही चळवळी समोर होते. कारण याही लढ्याचं स्वरूप हे शोषित विरुद्ध शोषक असंच होतं. त्यामुळे स्वत:चा आवाज ऐकू यावा यासाठी प्रत्येक प्रतिक्रिया भडकपणे देणं त्या वेळी आवश्यक आणि क्रमप्राप्त होतं. ती त्या काळाची गरज होती. मात्र आज निदान शहरात परिस्थिती थोडी तरी बदलते आहे. पांढरपेशा दलित समाज हा एक नवा वर्ग उदयाला येतो आहे. अशा वेळी दलित चळवळी समोरचे काही प्रश्न सोपे होतांना दिसत असले तरी नेमक्या याच वेळी ही चळवळ एका निसरड्या वळणावरून जात आहे. इतके दिवस दलित चळवळीला समाजातील विचार करणाऱ्या प्रत्येक घटकाचा पाठींबा आणि सहानुभूती होती. अजूनही आहे. मात्र आता एक सूर असाही ऐकू येतो की 'अन्याय झाला आहे हे मान्य आहे. त्या अन्यायामुळे झालेलं नुकसान त्यातल्या त्यात भरून काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांचं फलित म्हणून अनेक दलित घरातील मुलं शिकू लागली. आज अशी बरीच दलित घरं सापडतात की जिथली दुसरी किंवा तिसरी पिढी आज शिक्षण घेते आहे. हे सगळे जण काही आरक्षणात शिकलेले नाहीत. आरक्षण नाकारून स्पर्धा करून अनेक दलित मुलं शिकली आहेत. आता या सुशिक्षित दलित घरात आणि त्याशेजारच्या एखाद्या सवर्णाच्या घरात काय फरक आहे? शिक्षण सारखं, जीवनशैली सारखी, मिळकत सारखी... अशा वेळी अशा पांढरपेशा दलितांनी तरी "दलित" असणं बाजूला ठेऊन फक्त भारताचे जबाबदार नागरिक म्हणून भूमिका घ्यायला नको का? मोठ्याने गाणी लावणे, सगळ्या रहदारीची गैरसोय करून रस्त्यात नाचणे, जबरदस्तीने वर्गणी काढून उत्सव साजरे करणे हे पटत नाही अशी अनेक माणसं दलित समाजात नक्कीच असणार. पण मग ती आहेत कुठे? ती बोलत का नाहीत? त्यांच्या न बोलण्यामुळे इतर समाजासमोर दलित वर्गाचा हा समंजस, वैचारिक चेहेरा येतच नाही. दलित समाजाच्या बाजूने फक्त दलित नेतेच बोलतांना ऐकू येतात. आणि त्यांचा बोलण ऐकल्यानंतर 'हे लोक कधी सुधारणार नाहीत अशी प्रतिक्रिया इतर समाजात उमटते आणि हे दरी मग जास्त जास्त रुंद होत जाते. अशा वेळी तुझ्यासारख्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. कारण 'ते लोक' असं काही नसतं. प्रत्येक माणूस सारखाच असतो आणि अनेक माणसं एकत्र आल्यानंतर तयार होणारा ' जमाव' ही सगळीकडे सारखाच असतो हे जागतिक सत्य तुझ्या ब्लॉगच्या निमित्ताने तरी काही जणांना कळेल अशी आशा आहे. मी सुरुवातीला जे म्हटलं की दलित चळवळ एक पाऊल पुढे सरकते आहे कारण आता सो कॉल्ड ' न सुधारणाऱ्या ' समाजातून अशी प्रगल्भ प्रतिक्रिया येते आहे. आणि अशी प्रतिक्रिया निदान प्रातिनिधिक स्वरूपात येणं याचाच अर्थ चळवळीने एक पाऊल पुढे टाकणं असं मला वाटतं.

    ReplyDelete