Sunday, 17 April 2011

दलीतातला बामन्या

अनुपम खेर यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठींबा देतांना राज्य घटने बद्दल जे उद्गार काढले, त्याला विरोध करणा कसं चुकीचं आहे ह्या बद्दल मी माझ्या गेल्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं . दालीतेतारांच्या अनेक प्रतिक्रिया मला त्यावर मिळाल्या पण मी आवर्जून वाट पाहत असलेल्या दलित समाजातून मात्र मला फक्तं एकाच प्रतिक्रिया मिळाली, आणि ती होती माझ्या आईची;
अत्यंत तिखट अशी तिची प्रतिक्रिया होती. "अनुपम खेरांना हवा ते बोलण्याचा अधिकार आहेच पण म्हणून काय त्यांनी बाबांचा अपमान करायचा  का? आणि त्याचं मरूदे तुला आपल्या समाजाच्या विरोधात बोलतांना लाज नाही का वाटत ? ज्यांच्या मुले आज इथपर्यंत पोहचलात त्यांच्या बद्दल जराही अभिमान वाटत नाही का? समजा साठी चांगलं काही करता येत नाही तर निदान   वाईट तरी करू नका......"(आणि बरंच काही)
मातोश्रींच्या ह्या कडक प्रतिक्रियेनंतर मात्र इतर समाजबांधवांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणं मी सोडून दिलं. कारण मला जन्म देणाऱ्या, घडवणाऱ्या आईचं म्हणणं असं असू शकतं आणि तिला मी समाज विरोधक, जातीची लाज वाटणारा असा वाटू शकतो तर इतरांची प्रतिक्रिया ह्यापेक्षा   वेगळी काय असणार? परंतु मी खरच असा आहे का? कि मी शिकलो, शहरातल्या चांगल्या समजल्या जाणार्या वस्तीत राहू लागलो, ए.सी. कार मधून फिरू लागलो, माझे उच्चार 'आनी- पानी' चे नाहीत   ह्याचा अर्थ मी ज्या समाजात जन्मलो त्याची मला लाज वातूलागली  आहे? मला वाटतं हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. एक सुशिक्षित शहरी  तरुण त्याचा दलित असण्या बद्दल काय विचार करतो ह्याचा जरासा अंदाज येऊ शकेल असं ते मत असू शकेल. पण विषयाची व्याप्ती मोठी असल्याने  'मी यंदाची आंबेडकर जयंती कशी साजरी केली' एवढ्याच पुरतं आपण बोलू. आणि त्यातून काही सापडताय का ते पाहू....
परवा शूटिंग location वर जाताना आमचा स्पॉट बॉय म्हणाला,  "काय सर! काय शॉपिंग बिपिंग केला कि नाय?"  आपले सर हे 'आपल्यापैकीच' असल्याचा ज्याला अभिमान वाटायचा असा हा आमचा spoty . त्याच्या ह्या प्रश्नाने मला जाणीव झाली कि आंबेडकर जयंती जवळ आली आहे. (हो, नवीन कपडे नवीन वस्तू खरेदी करून मोठ्या उत्साहात 'जयंती' साजरी करण्याची पद्धत आहे. )
pack up झाल्यावर घरी आलो तर आमच्या मातोश्री पुतळ्यावर जाण्याच्या तयारीत होत्या. " ते शूटिंग चे अजागळ कपडे बदला आणि चांगला काहीतरी घाला, आज चा आपला वर्षाचा सन आहे." मातोश्री. (१३ एप्रिल ला मध्यरात्री १२ वाजता सर्वांनी नवीन शक्यतो पांढरे किंवा निळे ( निळा - ज्याची दालीतेतारांमध्ये 'जयभीम कलर' म्हणून हेटाई केली जाते.)कपडे घालून गावातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ एकत्र यायचं असतं.)
पांढरा झब्बा, पांढरी चप्पल, पांढऱ्या फुलांचा हार घेऊन पुतळ्यावर जाण्या इतका उत्साह माझ्यात नसला तरी त्या ठिकाणी आवर्जून न जाण्या इतका मी माझ्या समजा पासून तुट्लेलो पण नाही.म्हणून आम्ही गाडी काढली न पुतळ्या जवळ गेलो. मूठ आवळून एका बोटाने दिशा दाखवणारे बाबासाहेब दिव्यांच्या रोष्णाईत nhale होते. (दलितेतर ज्याला " स्टेशन कुठे आहे ? ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा पुतळा समजतात , तोच तो पुतळा.)
बाबांची लेकरं वाजत गाजत पुतळ्यावर जमत होती. गर्दीतल्या बुद्धाचार्यांनी बुद्ध वंदना म्हणायला सुरुवात केली . तशा गर्दीच्या नजरा पुतळ्यावर स्थिरावल्या.... सर्व पक्षान्चे  नेते बाबांच्या सर्वात जवळ जाऊन उभे होते, त्यांच्या नजरा मात्र  मिडीयाच्या कॅमेर्यान्वरच होत्या. कोणत्याही बलाचा वापर न करता एवढा मोठा मॉब आणि तोही आंबेडकरी मॉब असा शांत उभा आहे, मला वाटतं हे दृश्य फक्त 'जयंतीलाच' बघायला मिळू शकतं.  'साधू.. साधू .. साधू... म्हणत वंदना संपली आणि बाबांच्या गळ्यात हार घालायला म.न.पा. ची ट्रोली   त्यांच्या गळ्याकडे सरसावली. प्रथम नागरिक आणि स्थायी च्या अध्यक्षिन बाईंनी बाबांच्या गळ्यात हार 'फेकले' आणि सुरक्षा रक्षकांच्या कड्यातून त्या सुरक्षित स्थळी रवाना झाल्या. हो कारण 'ती लोक वाईट असतात ' असं कोणीतरी सांगून पाठवलेलं असावं. अन्यथा ४० % महिलांचा सहभाग असलेल्या जनसमुदायामध्ये त्यांना भीती वाटायचा तसं कारण नव्हतं. (माझ्या मते जगातील सर्व  चळवळींचा   विचार केला तर सर्वात jast   महिला ह्या फक्त निळ्या झेंड्या खाली एकत्र येताना दिसतील.) पण  सगळा दोष त्यांचा नव्हता, कारण वंदना संपल्या नंतर मॉब मॉब सारखा वगुलागला होता.' बाबासाहेब कोन थे ? ? इस देश के बाप थे.' ' एकंssच साहेब बाबासाहेब.'  अशा घोषणा सुरु झाल्या. केवळ राजकीय फायद्या साठी आलेल्या नेत्यांनी मिडिया वाल्यांना पोज दिल्या न कलटी मारली. तर बाबासाहेब आपल्या बा ची property  समजणारे दलित राजकीय पक्षांचे र कार्यकर्ते चक्क जोडे घालून पुतळ्याच्या  चौथर्यावर चढून बसले होते. "आपले लोक कधी नाही सुधारणार!" अशी नाराजी व्यक्त करत बाबांना मनोभावे वंदन करत ( आमच्यात नमस्कार नसतं म्हणायचं) मातेने परतीचा मार्ग धरला.
दुसर्या दिवशी पाहते लवकर उठून अंघोळ करून नवीन कपडे घालून घरावर निळा झेंडा लावायचा असतो. पाडव्याला गुढी उभारता तसा आम्ही सकाळी झेंडा लावला. त्या भोवती रांगोळी काढली. बाबासाहेबांचा मोठ्ठा फोटो अन त्यांच्या चरणाशी  गौतम बुद्धाची छोटीशी मूर्ती अशी आरास मांडली गेली. समोर मेणबत्त्या लावल्या गेल्या. वंदना घेण्यात आली. गोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. आमच्या कडे ह्यावेळी श्रीखंड पुरी चा बेत होता. ( इतर लोक जयंतीला नेहेमी चिडवतात ' काय मग आज निळं श्रीखंड का? ' खरंच पण खाण्याचा रंगं घालून कोणी विकलं तर आमचे लोक ते निळं श्रीखंड श्रद्धेने खातील. )
मी कलता झाल्या पासून जयंतीच्या दिवशी आमच्या कडे बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित एक तरी पुस्तक आणलं जात.( म्हणूनच इतर म्हणत असतील कि आमच्या मुले वह्या - पुस्तकांचे भाव वाढलेत म्हणून..:-)  ) 
मस्त गोडाचं जेवण, भीम गीतांची सी.डी., नवीन पुस्तकाचं वाचन अशी जयंतीची दुपार गेली. संध्याकाळी पुन्हा नवीन कपडे घालून मित्र, नातेवैकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जायचं असतं अन मिरवणुकीत सहभागी व्हायचं   असतं.  ह्या ठिकाणी मात्रं  मी मागे सरलो. सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या नागरी हक्कांची वाट लावत सण साजरा करण्याची कल्पना काही केल्या मला पटत नाही. मध्य रात्री पासून बरं  असलेलं आई च माझ्या बद्दल चं मत ह्या ठिकाणी पुन्हा एकदा बदलतं. पुन्हा तेच तुम्ही फार शहाणे झालात.. तुम्हाला आपल्या लोकांची लाज वाटते. 
आपली प्रतीकं आपली माणसं आपल्या पद्धती जपत इतर कोणत्याही भारतीय माणसा प्रमाणे आम्ही पण 'जयंती ' साजरी केली. काही गोष्टी मी मनापासून केल्या, काही  आई- वडिलांना बरं वाटावं म्हणून केल्या , काही उत्सुकते पोटी केल्या. आणि काही गोष्टी मी अजिबात नाही केल्या. आता मला सांगा ह्याचा अर्थ मला माझ्या जातीची लाज वाटते असा काढावा का? माझ्या सारख्या शहरी सुखवस्तू दलिताला लाज वाटायचा तसा करांच नाही, कारण दलित म्हणून होणारी अवहेलना माझ्या वाट्याला आलेलीच नाही. हो पण आज ज्यांच्या बरोबर आज मी जात शेअर करतोय त्यातल्या राजकीय नेतृत्वाची मात्र मला खरच लाज वाटते. खरतर राजवाड्यात राहणाऱ्या माझ्या समाजबांधवांची पण वाटते, पण त्यापासून माझं मन मला आडवत   कारण नुसती लाज वाटून काय उपयोग? शिकून सवरून मी पुढे सरकलो पण त्यांच्या साठी मी काय केलं? ह्याची बोच/ जाणीव मला आहे. मिळालेय संधीचा फायदा घेत अजून पुढे जायचं की समाजाच्या भल्या साठी काही करायचं? हा प्रश्न अजून तरी सुटलेला नाही. 
च्यायला शिकलो, विचार करू लागलो हे चुकलं तर नाही आमचं? जातीचा अभिमान बाळगत typical दलिता सारख जगावं तर  बुद्धीला ते पटत नाही. म्हणून जरा विरोधात मत मांडाव तर आम्हाला 'दलीतातला  बामन्या'  ठरवतात. बघू इथवर विचार केलाय तर पुढचामार्ग पण  सापडेलच. 
कोणी काहीही म्हणो पण यंदाच्या 'जयंती' निमित्ताने असं विचारमंथन  झालं , आणि ते तुमच्या सारख्या विचार करण्याचा अवयव असणाऱ्या मित्रांशी शेअर करायला मिळालं... हेच खरं  सेलिब्रेशन. 






जय भीम..










Monday, 11 April 2011

Trying to sya something to Anupam uncle.

 अनुपम खेर काकांना काहीतरी सांगायचं आहे, विषय खूप त्रासदायक आहे, पण प्रयत्न करतो.....
अनुपम काका  जंतर मंतर वर  अण्णा हजारेंना भेटायला गेले, आणि आपली राज्य घटना जुनाट झाली आहे ती बदलायला झाली आहे किंवा फेकून द्यायला झाली आहे , अशा आशयाचं काहीतरी वक्तव्यं केलं. आणि भीम सैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. ह्या घटनेचे अनेक पडसाद उमटले. उलट सुलट चर्चा झाल्या. पण एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विचार करण्याचा अवयव असणारा, दलित समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला माझा मत मांडणं महत्वाचं वाटतंय म्हणून हा ब्लोग प्रपंच...
१) लोकशाही राज्यात राज्यं घटने  बद्दल काही बोलणं  म्हणजे  घटनाकाराचा अपमान करणं आणि पर्यायाने तमाम दलित जनतेचा अपमान करणं, हे अगदीच न पटण्या सारखं आहे.हे तीनही स्वतंत्र विषय आहेत.
२) राज्य घटने बद्दल आपला मत, मग ते री. पा. इ. कार्यकर्त्यांच्या   दृष्टीने चुकीचं जरी असल तरीही ते मांडण्याचा संपूर्ण अधिकार ह्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने अनुपम खेर यांना दिलाय.
३) अनुपम खेर ह्यांनी घटनेत बदल करण्याची गरज आहे, किंवा अगदी ती फेऊन देण्याच्या लायकीची झाली आहे असा मत मांडलं तर बिघडल कुठे? राज्यं घटना हि काही कायम स्वरूपी तशीच असू शकत नाही, २/३ rd  मेजोरीतिने  त्या मध्ये बदल करता येऊ शकतात अशी तरतूद बनव्नार्यांनीच करून ठेवली आहे.  
 तर मग त्यात बदल झाला पाहिजे अशी मागणी करणार्याच्या घरावर हल्ला करण्याचा कारणच काय?
४) घटना हा काही दलित समाजाचा धर्म ग्रंथ नाही.. त्यावर संपूर्ण भारत देशाची मालकी आहे. मग माझ्या बांधवांनी इतका चिडण्याचा कारण काय?
५) त्याही पलीकडे आपल्याला नाही पटलं अनुपम खेराचं   म्हणणं तर तर त्याला विरोध करूयात न, पण सानाद्शील मार्गाने.. घरावर दगड मारून आपणच घटनेचा अपमान करतोय. 
चांगल्या कामाला पाठींबा द्यायालागेलो  तर माझ्याच घरावर  हल्ला  केला? अस म्हणून अनुपम काका जर तमाम दलितान बद्दल मनात राग धरून बसले असतील तर त्यांना एकाच विनंती आहे कि कृपया दलित नेते आणि त्यांचे मुठभर अंध कार्यकर्ते यांचा मत हे सर्व दलित जनतेचा मत आहे असा समाज करून घेऊ नका. नाहीतर हि दरी अजून वाढतच जाईल.तुम्ही रागाऊ नका आपण हे सांधायचा प्रयत्न करूयात. 
आणि माझ्या भावांनो आपण सगळे भीमाची लेकरे आहोत आपल्याला आपल्या दैवताच सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्या महामानवाला शोभेल असाच आपण वागुयात. उलट्या बाजूची अस्पृश्यता आपल्याला नकोय. 
झाल्या कृत्य बद्दल अनुपम काकांची माफी मागावी इतकी संवेदनशीलता दलित समजा मध्ये नक्कीच आहे. So Anupam uncle I've tried to say something to you, hope you will take it easy for the sake of humanity.
Jay Bheem. :-)

Sunday, 10 April 2011

वाढदिवसाचं अनमोल गीफ्ट.

काल माझा वाढदिवस होता. वाढदिवस म्हटला की आपल्याला अनेक गिफ्ट्स दिली जातात किंवा  मिळतात. ह्या 'दिल्या जाणाऱ्या' गिफ्ट्स चा आपल्याला अंदाज असतो मात्र 'मिळणाऱ्या गिफ्ट्स' ह्या अनपेक्षित अन सुखद असतात, असा माझा अनुभव आहे. असाच एक लई भारी गीफ्ट काल मला मिळालं. आणि ते म्हणजे एक 'ब्लॉग स्पॉट....' .
हा ब्लॉग पुण्यात राहणाऱ्या एका मुलीने लिहिलेला आहे. आणि गंमत म्हणजे हे लेकरू फक्त १० वर्षाचं आहे. म्हणजे ज्या वयात मी शुद्धलेखन गिरवत होतो त्या वयात हि मुलगी चक्क ब्लॉग लिहिते... म्हणून मला तिचं जाम कौतूक वाटलं. गेले तीन चार दिवस नेट वर 'आण्णा हजारे चूक की बरोबर' हा वाद घालून कंटाळा आला होता. असं असताना ह्या टीन्गु चा ब्लॉग वाचणं हा अतिशय धम्माल अनुभव होता.
आपल्या वयाला शोभतील असे विषय ..त्याच वयाची भाषा ... चार ओळी वाचल्या तरी आपल्याला बालपणात घेऊन जाईल अशी शैली.
ऐकून तुम्हालाही गंमत वाटेल...पोस्ट चे विषय होते, माझे आजोबा, माझी आजी, माझी आई, माझे बाबा अन माझा छोटा भाऊ. :-)
जे विषय निबंधाच्या वहीत लिहायला पण मुलं कंटाळा करतात, ते विषय ह्या चिमुरडीने ब्लॉग वर लिहिलेत. त्या चिमुकल्या मेंदूतून काय काय प्रकट झालंय ते आपण प्रत्यक्षच  वाचा, मी फक्त माझी excitement share  करतोय. 

Saieepuranik.blogspot.com

सई ची भाषा वाचून शंकाच उरत नाही की हा ब्लॉग खरच तिने स्वत: लिहिलाय म्हणून. कदाचित आई, बाबांनी ब्लॉग तयार करायला मदत केली असेल पण 'ब्लॉग म्हणजे काय?, आपला पण स्वत: चं एक ब्लॉग असावा, ह्या विचार पर्यंत ती वयाच्या दहाव्या वर्षीच पोहोचली, ह्याचा श्रेय तिला दिलंच पाहिजे. आणि त्याहीपेक्षा नंतर विषय निवडणे, ब्लॉग वर देवनागरी मध्ये लिहिणे ह्या गोष्टी सोप्या नव्हेत .
पूर्वी ४० वर्षांनी एक पिढी बदलायची. आता मात्र चार वर्षांनी पिढी बदलते आहे. अशा वेळी मोठ्या माणसांनी हे समजून घेतल पाहिजे की या मुलांशी वागतांना फार सावध राहील पाहिजे. या मुलांना मोठी माणस 'मोठेपणाच्या' अधिकाराने दडपून टाकू शकत नाहीत.  या मुलांच्या हातात व्यक्त होण्यासाठी इंटरनेट सारख माध्यम आहे.
या मुलांच्या पालकांना आणि शिक्षकान्नाही हे पचवणं फार अवघड जाणार आहे की आपल्याला न येणाऱ्या अनेक गोष्टी ही मुल सहज करतात.
आपण या मुलांची माध्यम आणे व्यक्त होण्याचे परिभाषा जितक्या लौकर शिकू तितके आपले त्यांच्याशी सम्बन्ध चांगले राहण्याची शक्यता जास्त आहे... आणि आपण जर वेळेत ही परिभाषा शिकलो नाही... पण मला वाटत आपल्याला आता ते न शिकण्याचा पर्याय उरलेलाच नाही.